लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीची कर्जमर्यादा तीस लाख रुपये तसेच नवीन विस्तारीत शाखा काढण्याचा निर्णय पतपेढीच्या ५२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाला असल्याची घोषणा अध्यक्ष सुनीता पाटील यांनी केली. याशिवाय ज्युनिअर काॅलेजमधील सेवकांना सभासद करून घेण्यासाठी पोटनियम दुरूस्ती मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. येथील पतपेढी कार्यालयामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. ही सभा सुमारे दीड तास चालली.
यावेळी पाटील म्हणाल्या, पतपेढीची गत आर्थिक वर्षात उच्चांकी उलाढाल झाली असून, पतपेढीची प्रगती नेत्रदीपक झाली आहे. कोरोनाच्या काळातही पतपेढीच्या ठेवी व कर्जांमध्ये चांगली वाढ झाली असून, भविष्यात कर्जावरील व्याज कमी करण्याचे धोरण आखण्यात येत आहे. पतपेढीला ३८ लाखांचा नफा झाला असून, सभासदांना बारा टक्के लाभांश वितरीत करण्यात आला असल्याचे सांगितले.
पतपेढीकडून पूरग्रस्त शाळांना मदत, सभासदांच्या मुलीच्या विवाहाप्रसंगी सुकन्या योजना कार्यान्वित केली आहे. याशिवाय मयत सभासदांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात आल्याचे सांगितले. पुणे पदवीधर मतदार संघातून आमदार जयंत आसगावकर यांच्या विजयानिमित्त त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
या सभेला संचालक तानाजी पाटील, सुप्रिया शिंदे, महादेव चौगले, प्रकाश वरेकर, एस. बी. पाटील, आर. एस. पाटील, मनोहर पाटील, एल. डी. पाटील, आर. बी. पाटील, मनीषा खोत, अरूण कांबळे, व्ही. के. शिंदे, शिवाजी लोंढे, माजी संचालक किरण पास्ते उपस्थित होते. प्रारंभी व्यवस्थापक अभय व्हनवाडे यांनी प्रास्ताविक केले. या ऑनलाईन सभेत आमदार जयंत आसगावकर, रामदास पाटील, विजय पाटील, बी. के. मोरे, सुनील ठाणेकर, अमोल नगारे, सत्यविजय नलवडे, उदय पाटील, के. के. पाटील, आर. एस. पाटील, तोरस्कर सर आदी सभासद सहभागी झाले होते.
फोटो
पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष सुनीता पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते.