प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर यांनी आज, मंगळवारी नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेऊन प्रार्थना केली. ह्याआधीही सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघे पिता पुत्र नृसिंहवाडी इथे दर्शनासाठी आले होते. मात्र आता एकटाच अर्जुन दत्त दर्शनासाठी आला होता.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नृसिंहवाडी इथील दत्त मंदिरात आज दुपारी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर यांनी दत्त दर्शन घेतले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर अर्जुन दत्त महाराजांच्या दर्शनाला पोहचला आहे. दत्त दर्शन झाल्यानंतर प्रार्थना करण्यात आली. यावेळी दत्त देवस्थान चे अध्यक्ष वैभव काळू पुजारी, स्वरुप पुजारी यांनी श्री ची प्रतिमा देवून स्वागत केले. या आधी पहाटे सचिन तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर हे पिता-पुत्र दर्शनासाठी आले होते. त्यानंतर अर्जुनने दर्शन घेतले. मंदिर परिसरात अर्जुन तेंडुलकरला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी अर्जुनने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे टाळली.
अर्जुनची IPL कारकीर्द अर्जुन तेंडुलकरला २०२१ मध्ये आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने २० लाख रुपयांना त्यांच्या संघात समावेश केला होता. पण अर्जुनला दुखापत झाली आणि त्यामुळे तो संपूर्ण हंगामाला मुकला. त्याच्या जागी सिमरजीत सिंगला संघात संधी मिळाली. यानंतर मुंबई इंडियन्सने २०२२ च्या लिलावात ३० लाखांत त्याला पुन्हा घेतले. अर्जुनने १६ एप्रिल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पदार्पण केले. अर्जुनने या सामन्यात २ षटकांत १७ धावा दिल्या होत्या. मुंबई इंडियन्सने गेल्या तीन वर्षांत एकूण ४४ सामने खेळले आहेत. यामध्ये अर्जुनला केवळ ५ सामन्यात संधी मिळाली. ५ सामन्यांमध्ये त्याने ९.५० च्या इकॉनॉमीने ३ विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने या कालावधीत ९५ धावा केल्या.