कोल्हापूर : मंगळवार पेठेतील एन. सी. सी. मैदानशेजारील शासकीय जमिनीवर प्लॉट पाडून त्यांची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार मल्हारराव देसाई, माजी महापौर बाबू फरास यांच्यासह एकूण १६ जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा नोंद केला. या प्रकरणी राजेश महादेव सणगर (वय ४६, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर, कोल्हापूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या प्रकरणी जयकुमार मल्हारराव देसाई व शिवानी दिलीप देसाई (रा. दोघेही न्यू शाहुपूरी), माजी महापौर बाबू फरास (रा. बालगोपाल तालीम परिसर), राजेंद्र व रणजित मूलचंद शहा (रा. दोघेही कोल्हापूर), आर. व्ही. खर्डेकर (रा. ताराबाई पार्क), बी. डी. चव्हाण (कसबा बावडा), गोखले कॉलेजचे माजी प्राचार्य एस. डी. साठे व एस. जी. खडके, ए. ए. माने व एस. एस. लोहार (दोघेही वडगाव), एस. ए. पाटील (शाहू हायस्कूल, कागल), एस. जी. सावंत मुख्याध्यापक मुरगूड हायस्कूल, लीना रमेश सावंत (मुंबई), एस. डी. साठम (खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग), व्ही. एल. पाटील (रा. बेक्केरी, ता. रायबाग) यांच्यावर फसवणुकीचा (भादंवि कलम ४२०, ४०९ व ३४ अन्वये) गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार पेठेतील सि.स. नं. १९२४/अ-१ ख/२/अ/२, बी वॉर्ड ही जमीन शिक्षण प्रसारक मंडळाने केलेल्या मागणीवरून राज्य शासनाने त्यांना १९५८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वाने (एल) अटी व शर्तींना अधीन राहून दिली होती; पण शिक्षण प्रसारक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी ही जमीन भाडेपट्टी (एल) ऐवजी धारक (एच) अशी नोंद करून घेतली.
या शिक्षण मंडळाची ही जागा नसताना कागदपत्रांत फेरफार करून, खोटी माहिती देऊन, शासनाची जमीन फिर्यादी तसेच अन्य ६६ लोकांना प्लॉटिंग पाडून बेकायदेशीरपणे विक्री केली. या प्रकारे शासनाची फसवणूक केल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाच्या १६ पदाधिकाऱ्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
संबंधित जमिनीचे धारक हे शिक्षण प्रसारक मंडळ असून त्याबाबत शासनाचे नगरविकास खाते व धर्मदाय आयुक्तांनी जमीन सभासदांना विक्रीसाठी परवानगी दिलेली आहे. त्यासंबंधीची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. त्यातील काही जागेवर आमची शाळा, मुलींचे होस्टेल कार्यरत आहे.- प्रा. जयकुमार देसाई, सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर