कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी परस्परविरोधात एकूण ४२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर त्यातील नऊजणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, दत्तवाडमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी गावात भेट देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
दत्तवाड येथील ग्रामपंचायत सदस्य नूर काले यांच्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट झाल्याने शिवसेनेने कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून काले यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. हाच राग मनात धरून काले समर्थकांनी तालुका उपप्रमुख युवराज घोरपडे यांच्या हॉटेलवर दगडफेक केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येताच काले व शिवसेना कार्यकर्त्यांचा जमाव समोरासमोर आल्याने दोन गटांत राडा झाला. वातावरण चिघळल्याने मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला.
या प्रकरणावरून अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आसमा काशिद काले, बिस्मिल्ला अकबर काले, सलमा नूर काले, बेबीजान कल्लाउद्दीन काले, बेबीकरीम होडेकर, नूर काशिम काले, अकबर काशीम काले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तर वीट, दगड काठ्यांचा वापर करून धमकी दिल्याप्रकरणी लाला माजरेकर, अजिंक्य पवार, सोहेल गवंडी, सूरज गवंडी, अबू काले, असिफ काले, अल्ताफ अपराध, अकबर काले, समीर काले, करण कुरणे, बुड्डा काले, सतीश वडर, दादा काले, साकीब काले, अंकुश दलवाई, बाळू धुमाळे, सागर कोळी, आस्मा काले, सलमा काले, बेबी काले यांच्याविरुद्ध युवराज घोरपडे यांनी तक्रार दिली आहे.
मारहाणप्रकरणी संतोष कोटकर यांनी स्वप्निल कांबळे, साहील मुल्ला, लखन कांबळे, अवधूत कामत, मोहन माळगे, नितीन कांबळे, राकेश व स्वप्निल मगदूम, अजय पवार, सतीश वडर, बाळू धुमाळे अशा तेरा जणांविरुद्ध तक्रार दिली आहे.
फोटो - २१०३२०२१-जेएवाय-०८, ०९ फोटो ओळ - ०८) दत्तवाड (ता. शिरोळ) येथे रविवारी पोलिसांनी संचलन केले. ०९) दत्तवाड (ता. शिरोळ) येथे शांतता बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी शांततेचे आवाहन केले.