कोल्हापूर : सोने, मोटार देण्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी शुभ ट्रेड बीज इंडिया या कंपनीचा संचालक अभिजीत धोंडिबा सावंत (वय ४०, रा. कोल्हापूर) याला पुण्यातील सिंहगड पोलिसांनी अटक केली. त्याच्या कोल्हापुरातील ताराबाई पार्क, क्रिस्टल प्लाझामधील कार्यालयात शुकशुकाट होता. ऑडिट कामांसाठी तीन दिवस कार्यालयातील व्यवहार पूर्णता बंद असल्याचे तेथील प्रतिनिधींनी सांगितले.
पुण्यातील नांदेड सिटीमधील निखिल मिरजे या बांधकाम व्यावसायिकाची जुलै २०२० मध्ये संशयित अभिजीत सावंत याने भेट घेतली, तसेच
कोल्हापुरातील शुभ ट्रेड बीज इंडिया या कंपनीत गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. त्यावेळी त्यांना बक्षीस म्हणून दुचाकी, चारचाकी व सोन्याचे दागिने देण्याची जाहिरातबाजी केली. शुभ ग्रुपमध्ये विविध फर्म असून मुख्य कार्यालय ताराबाई पार्क येथे असल्याचेही सांगितले. जुलै ते सप्टेंबर २०२० अखेर ६३ लाख रुपये गुंतवले. परताव्याचे पैसे परत मागताना सावंत याने त्यांना शिवीगाळ करून पिस्तुलाचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले.