कोल्हापूर : शहरात विनापरवाना डिजिटल फलक, स्वागत कमानी उभारणाऱ्यांवर महापालिकेच्यावतीने पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरू केली. सोमवारी शाहूपुरी बेकर गल्ली आणि नागाळा पार्क परिसरातील महावीर कॉलेजजवळ उभारलेल्या डिजिटल फलकांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हे नोंदविले.
गुन्हे नोंद झालेल्यांची नावे : अंजली जाधव, ऋतुराज जाधव, अल्फाज नाईक, शाबाद आत्तार, वाशिम मुजावर, अनिल नाईक, फैय्याज स्वार, अनिस मुल्लाणी.
शहरात विनापरवाना डिजिटल फलक उभारल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. याविरोधात महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्यावर्षी शहरातील विनापरवाना डिजिटल फलक जप्तीची कारवाई सुरू केली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात ही कारवाई बंद झाली. गेल्या महिन्यापासून पुन्हा कारवाई तीव्र केली आहे.
महावीर कॉलेज येथे उभारलेल्या गणेश जयंतीच्या फलकावर सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जप्तीची कारवाई केली. याप्रकरणी अंजली जाधव आणि ऋतुराज जाधव यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. शाहूपुरी बेकर गल्लीत अल्फाज नाईक यांच्या वाढदिवसाचा शुभेच्छा फलक उभारला होता. हा डिजिटल फलक जप्त केला. महापालिकेचे कर्मचारी रवींद्र भोसले यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली.