लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील माजी सरपंच तानाजी कृष्णात पाटील व ग्रामसेवक शिवाजी परसू कांबळे यांनी गायरान जमिनीतील प्लॉट वाटप बेकायदेशीर केल्याबद्दल गांधीनगर पाेलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. दोघांनी संगनमताने सर्व्हे क्रमांक ३९७/अ/ १ व ३९७/अ/२ मधील कोट्यवधी रुपये किमतीचे प्लॉट वाटप केल्याची तक्रार अमोल शिरगावे यांनी केली होती. याबाबत, तानाजी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
तानाजी पाटील हे २०१० ते २०१५ या कालावधीत सरपंच, तर २०१५-२०२० या कालावधीत उपसरपंच म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी सर्व्हे क्रमांक ३९७/अ/१ व ३९७/ अ/ २ मधील भूखंड ११४ लोकांना बेकायदेशीर वाटप केले होते. स्वत:चे नातेवाईक, तसेच राजकीय हितसंबंधातील व्यक्तींना भूखंड वाटप करताना त्यांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नसल्याची तक्रार अमोल शिरगावे यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, काेल्हापूर यांच्याकडे केली होती. या लाभार्थीकडील जमा महसुलाची ग्रामपंचायतीकडे नोंद नसल्याचे आढळून आले असून, पाटील व कांबळे यांनी पदाचा गैरवापर केल्याने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश गांधीनगर पोलिसांना दिल्याचे अमोल शिरगावे यांनी पत्रकात म्हटले आहे.
शिक्षक, शासकीय कर्मचारी लाभार्थी
या ११४ भूखंडाचे भांडवली मूल्य ४ कोटी ४५ लाख २४ हजार ६३१ रुपये होत असले तरी बाजारभावानुसार या भूखंडाची किंमत २० ते २५ कोटी रुपये होतात. लाभार्थ्यांमध्ये शिक्षक, शासकीय व निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे शिरगावे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- राजाराम लोंढे