:राधानगरी अभयारण्य ग्रस्तांना भरपाईपोटी मिळालेले व तहसीलदार यांच्या संयुक्त बँक खात्यावरील पैसे तहसीलदारांची खोटी सही व शिक्क्याचा वापर करून उचलल्याप्रकरणी संशयित दीपक दत्तात्रय पाटील याच्यावर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नायब तहसीलदार विजय जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिली. ७ जानेवारीला येथील बँक ऑफ इंडिया च्या शाखेत हा प्रकार घडला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राधानगरी अभयारण्यामुळे विस्थापित होणाऱ्या करंजे येथील अंजली पाटील, जयवंत पाटील, लक्ष्मी पाटील यांना उपजीविकेसाठी जमीन घेण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम त्यांच्या व तहसीलदार यांच्या संयुक्त खात्यावर होती. ही व्याजासह रक्कम १५ लाख ३३ हजार आठशे तहसीलदार मीना निंबाळकर यांची खोटी सही व खोट्या शिक्क्याचा वापर करून लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आली. दुसऱ्या दिवशी वर्षा परब, संतोष परब, विकास परब यांच्या खात्यावरील १५ लाख २७ हजार चारशे ही रक्कमही वर्ग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहीमध्ये शंका वाटल्याने बँकेतून तहसीलदार यांना विचारणा झाल्यावर हा प्रकार उघड झाला. चौकशीत खोटी सही व शिक्का करण्याकामी पाटील याचा हात असल्याचे लाभार्थी यांनी सांगितल्यामुळे त्याच्यावर शासनाची दिशाभूल करून तहसीलदार यांच्या सही व शिक्क्याचा गैरवापर केल्याप्रकरणी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला.