लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : पाडळीच्या ग्रामसेवकांना दमदाटी करत कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी सरपंच,उपसरपंचांसह अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली. हा प्रकार ९ मार्चला घडला. याप्रकरणी गुरुवारी मध्यरात्री वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सरपंच विभा दीपक पाटील, उपसरपंच रवींद्र मेथे-पाटील, श्रीधर सुभाष पाटील, कोंडिबा पवार, भाग्यश्री गायकवाड, उषा दाभाडे अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ग्रामविकास अधिकारी अनिल दगडू भारमल यांनी फिर्याद दिली.
तपास हवालदार संतोष माने करत आहेत.
अधिक माहिती अशी,
पाडळी येथील ग्रामपंचायतीमध्ये भारमल हे २०१७ पासून ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ९ फेब्रुवारी ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर होऊन नवीन सरपंच, उपसरपंच निवडी झाल्या. दरम्यान,
९ मार्चला भारमल हे ग्रामपंचायतीचे शासकीय कामकाज पाहण्यासाठी जात होते. त्यावेळी श्रीधर पाटील यांनी भारमल यांना तुम्ही ग्रामसेवक म्हणून नेमणुकीस असल्याबाबत ऑर्डर आणल्याशिवाय ग्रामपंचायतीमध्ये येऊ नका, असे सांगितले. तर
सरपंच विभा पाटील यांनीही भारमल यांना ग्रामपंचायतीमध्ये न येण्यासाठी हुज्जत घातली. उषा वसंत दाभाडे यांनी भारमल यांना दमदाटी केली तसेच श्रीधर पाटील यांनी आपणास ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यास बेकायदेशीररित्या अटकाव केला. सरकारीकामात अडथळा आणला. श्रीधर पाटील व उषा दाभाडे यांनी ‘अपशब्द’ वापरून हुज्जत घालून ग्रामपंचायत कार्यालयात जाऊ दिले नाही, अशी तक्रार भारमल यांनी दिली आहे.