गडहिंग्लज :
अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत १ लाख ११ हजार रुपये उकळल्याप्रकरणी दशरथ वाघराळकर, श्रीकांत जाधव, संजय कांबळे (सर्वजण रा. हसूरवाडी, ता. गडहिंग्लज) या तिघांविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हसूरवाडी येथील अंकुश गोरे हे उत्तराखंड येथे भारत-तिबेट सीमा पोलीस दलात सेवेत आहेत. ऑगस्टमध्ये ते रजेवर गावी आले होते. कोरोनामुळे त्यांची कोविड चाचणी करून त्यांना १३ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले होते.
तथापि, गावातील कांही लोकांना १३ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच घरी सोडण्यात आल्याचे समजल्यामुळे गोरे यांनी त्याबाबत वाघराळकर यांच्याकडे फोनवरून विचारणा केली तेव्हा अपशब्द वापरल्याच्या कारणातून दोघांत वाद झाला.
वाद मिटविण्यासाठी वाघराळकर, जाधव व कांबळे यांनी संगनमत करून गोरे यांच्याकडे १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर तुझी नोकरी जाईल, अॅट्रासिटीची केस करेन अशी धमकी दिली आणि त्यांच्याकडून त्यांनी १ लाख ११ हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले.
अंकुश गोरे यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे अधिक तपास करत आहेत.