कोल्हापूर : ज्ञात स्रोतापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकासह त्यांच्या पत्नी व मुलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी गुन्हा दाखल केला. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक जेडी ऊर्फ जनार्दन दगडू जाधव (वय ६२), त्यांच्या पत्नी जयश्री जनार्दन जाधव (५४), मुलगा प्रसाद जनार्दन जाधव (सर्व रा. प्लॉट नं. ३१, गुरुकृपा बंगला, न्यू पॅलेस, छत्रपती पार्क, रमणमळा, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. जाधव यांनी त्यांच्या व कुटुंबीयाच्या नावे ज्ञात उत्पन्नाचे स्रोतापेक्षा ३० लाख ५६ हजार ४२६ रुपयांची अपसंपदा असून त्याचे प्रमाण ४८.७१ टक्के असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आजरा पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक जनार्दन जाधव याच्याविरोधात लाचप्रकरणी गुन्हा दाखल होता. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जाधव याच्या रमणमळा येथील घराची झडती घेतली. त्यात संशयित जाधवच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याची विभागाने परवानगी मागितली. त्यानुसार विभागाच्या उपायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी तपास केला. चौकशीत जनार्दन जाधव यांनी त्यांच्या व कुटुंबीयाच्या नावे ज्ञात उत्पन्न स्रोतापेक्षा ३० लाख ५६ हजार ४२६ रुपयांची अपसंपदा असून त्याचे प्रमाण ४८.७१ टक्के असल्याचे पुढे आल्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. त्यानुसार सेवानिवृत्त उपनिरीक्षक जाधवसह पत्नी व मुलगा अशा तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२)सह कलम १०९ प्रमाणे सरकारपक्षातर्फे उपअधीक्षक बुधवंत यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला.
संपादित मालमत्तेची झडती सुरूच...
गेल्या काही वर्षामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई केली. संशयित जाधव यांच्या घराची व इतर संपादित मालमत्तेची झडती प्रक्रिया सुरू आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत करीत आहेत.
कोट...
लाच देणे-घेणे अथवा अपसंपदेबाबत तक्रारी असल्यास त्याबाबत नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधावा, त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील- आदीनाथ बुधवंत, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, कोल्हापूर.