कोल्हापूर : रमणमळा येथील निवडणूक कार्यालयाकडे ड्यूटीवर जात असताना दसरा चौकात दुचाकींची समोरासमोर धडक होऊन गगनबावडा तहसील कार्यालयातील तलाठी जयंत चंद्रहार चंदनशिवे (वय ४६, रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) हे ठार झाले. मोपेडवरुन विरुध्द दिशेने येवून तलाठी चंदनशिवे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेप्रकरणी महिला चालकावर लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संध्या शिरीष महाजन (वय ३०, रा. शाहुपूरी २ गल्ली, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. २२ एप्रिलला सकाळी हा अपघात झाला होता.लोकसभा निवडणुकीसाठी रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामामध्ये मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार असल्याने लवकर बोलविले होते. कोल्हापुर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये साहित्य वाटप व जमा करण्याकरिता तलाठी चंदनशिवे दूचाकीवरुन निघाले होते.
दसरा चौकात येताच व्हीनस कॉर्नरकडून दसरा चौकमार्गे रमणमळा कार्यालयाकडेच विरोधी दिशेने जाणाऱ्या मोपेडने त्यांना धडक दिली. त्यामध्ये चंदनशिवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेप्रकरणी लक्ष्मीपूरीचे कॉन्स्टेबल सुभाष अर्जुन सरवडे यांनी संशयित मोपेड चालक संध्या महाजन यांचे विरोधात फिर्याद दिली. अविचाराने, हयगयीने, विरोधी दिशेने मोपेड चालवून दूचाकीला धडक दिलेची तक्रार त्यांचे विरोधात आहे.