कोल्हापूर : नोंदणीकृत अभियंत्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला, त्याप्रकरणी अभियंत्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मिलिंद पाटील (वय ४५, रा. इचलकरंजी) असे त्या संशयिताचे नाव आहे. हा प्रकार कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी नगररचना सहायक संचालक प्रसाद सोनबा गायकवाड (वय ४७) यांनी पोलिसांत तक्रार दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रसाद गायकवाड हे नगररचना विभागात कार्यरत आहेत. ते कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत गुरुवारी (दि. २) रात्री उशिरापर्यंत काम करत करत होते. त्यावेळी नोंदणीकृत अभियंता संशयित मिलिंद पाटील हा कार्यालयात आला. त्यावेळी त्यांनी रेखांकनाचे काम आताच मंजूर करून द्यावे म्हणत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वादावादी करून हुज्जत घातली. याबाबत गायकवाड यांनी त्यांना विचारणा केली. त्यावेळी त्याने त्यांच्याबरोबर उद्धट वर्तन करून त्यांच्या अंगावर धावून गेला. तसेच स्वतःच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट करतो, अशी धमकी देत कार्यालयीन कामात अडथळा निर्माण केला. याबाबत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.