पेठवडगाव : प्रसूतीदरम्यान महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोन डाॅक्टरांसह तिघांवर
वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तब्बल १९ महिन्यांनी निष्काळजीपणे व हयगय केल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. यशवंत केळुसकर, त्यांच्या पत्नी विद्या केळुसकर (दोघे रा.पेठवडगाव),भूलतज्ज्ञ डॉ. दीपक शिंदे (रा. कोल्हापूर) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. याबाबत फिर्याद सुभाष शंकर पाटील (वय ४०, रा. कणेगांव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठवडगाव येथील एस. टी. स्टँड पाठीमागे केळुसकर हाॅस्पिटल आहे. येथे स्त्री रोग व प्रसूती उपचार करण्यात येतात. येथे पाटील यांच्या पत्नी अश्विनी यांच्या पहिल्या मुलीचीही प्रसूती केळुसकर हाॅस्पिटलमध्ये करण्यात आली होती नंतर दुसऱ्यांदा प्रसूतीपूर्व उपचारासाठी पाटील दाम्पत्य येत होते. १२ मे २०१९ ला केळुसकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून बीपी वाढला आहे. त्यामुळे सिझेरियन करावे लागेल, असे सांगितले. तशी तयारी केली. मात्र, पहिल्यांदाच भूल चढली नाही म्हणून पुन्हा भूल देण्यात आली. यावेळी प्रसूती करण्यासाठी डॉ. यशवंत केळुसकर, भूलतज्ञ डॉ. अनिल शिंदे, सहाय्यक म्हणून विद्या केळुसकरही उपस्थित होत्या. उपचारादरम्यान गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानंतर सीपीआर रुग्णालयात त्यांना मृत घोषित केले.