आर. एस. लाड ।आंबा : कोल्हापूर-रत्नागिरी सीमेवरील आंबाघाट परिसरात वाहने पेटवून देणारे प्रकार नवीन नाहीत. गुन्ह्यात वापरणारी वाहने दरीत सोडणे, पेटवून देणे या घटना अधूनमधून घडताना दिसतात. वाहन पेटवून दिले की, ते तेथेच सडते. त्याची चौकशी करावी, असे यंत्रणेला वाटत नाही. वनभोजनातील चुली विझविण्याची जाणीव नसलेली वृत्ती जंगलाना व डोंगरांना आगी लावून जाते. या घटनांकडे बघत राहणारी उदासिनता येथील जैवविविधता व ऐतिहासिक वारसा यांच्या अस्तित्वाला गालबोट लावणारी ठरत आहे.
गुन्हेगारी प्रकारांवर पोलिसांचा अंकुशया भागात आवश्यक आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी रत्नागिरी हद्दीत आंबाघाटात असाच खून करून टाकलेला मृतदेह सडलेला अवस्थेत आढळला. तीन वर्षांपूर्वी त्याच परिसरात गायमुखाजवळ एक अर्भक करवंदाच्या जाळीत दरीत टाकले होते. वजरे खिंडीतही खून केल्याची तीन वर्षांपूर्वीची घटना आहे. पाच वर्षांपूर्वी चक्रीवळणावर पेट्रोल अंगावर टाकून मृतदेहाचा कोळसा केला होता. घाटात घडणाऱ्या बहुतेक घटना सांगली, कोल्हापूर व सीमाभागातील आहेत. खून करून कोकण हद्दीतील दरीत टाकले की, पंधरा दिवसांत जंगली प्राणी त्याची विल्हेवाट लावत असल्याने पुराव्याअभावी गुन्हेगारी घटनांवर पडदा पडताना दिसतो. आंबाघाटात वाहने लुटली जात होती, तेव्हा गायमुख येथे गस्तपथक तीन वर्षे होते. तेव्हा दरोडे थांबले. आता विशाळगड फाटा व घाटाचे प्रवेशद्वार येथे गस्त घालणारी पथके जरी उभारली, तरी यावर नियंत्रण येईल.
विशाळगडावरील पोलीस औट ठाणे उरूस, अन् महाशिवरात्रीला उघडते. घाट व कोकण यांना जोडणारा आंबा व अनुस्कुरा घाटांत रत्नागिरी विभागाचे पोलीस पथक कार्यरत आहे; पण शाहूवाडी पोलिसांची ठाण्यातून देखरेख राहते. आंबा येथील पोलीस औट ठाणे गेल्या तीन दशकांपासून बंद आहे. ही इमारत कोलमडली आहे. वाढते पर्यटन, नाणीज मठातील वाढलेला भाविक वर्ग, वर्षा पर्यटनाची वाढती क्रेज पाहता या दुर्गम भागात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त व पोलीस मित्र व्यवस्थेची साखळी उभारण्याची गरज आहे. उरूस, सुट्टी, उत्सव या काळात फिरत्या गस्थ पथकाची गरज आहे.
धोकादायक धबधबा स्थळ
- आठ वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याजवळ असलेला धबधबा पॉर्इंट येथे मद्य सेवन केलेल्या तरुणांनी थेट वाहन दरीलगत नेले. गवतावरून गाडी न वळल्याने सुमो थेट दीड हजार फूट दरीत कोसळून दहाजण जागीच ठार झाले होते. आज तेच ठिकाण तारेने बंदिस्त करून तेथे मनोरा उभारून वनविभागाने सुरक्षित निर्सग पÞॉर्इंट उभारला आहे. अशी रस्त्यालगत दरी, जलसाठे व नदीपात्रे धोकादायक अवस्थेत आहेत; पण तेथे मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होत नाही, याचे आश्चर्य वाटते.
कोकण व घाट यावर नियंत्रण ठेवण्यास ब्रिटिश काळात आंब्याच्या सड्यावर पोलीस ठाणी होती; पण आज तेच ठाणे मोडकळीस आले आहे.