पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये वाहनांच्या रांगा आणि गाड्यांचा गराडा असताना वाहने पकडली किती आणि दंडात्मक कारवाई झाली किती, यावरून वादाचे प्रसंग घडत आहेत. या सर्व १२२ मोटारसायकलधारकावरील कारवाई संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे.
कोरोना कालावधीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जून महिन्यामध्ये कडक निर्बध लागू केले होते. लॉकडाऊनचे निर्बंध तोडणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली होती. तालुक्यातील रामलिंग, धुळोबा, अलमप्रभू, कुंथूगिरी या धार्मिक आणि पर्यटनस्थळांवर गर्दी करणाऱ्या, विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. एका जून महिन्यामध्ये पोलिसांनी ३२ चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले. तसेच १२२ मोटारसायकल धारकांच्याकडून ५३ हजार रुपयाचा दंड वसूल केला.
पोलीस ठाणे आवारासमोर मोटारसायकल लावण्यासाठी जागा कमी पडत असताना, मोटारसायकलच्या रांगा लागलेल्या असताना पोलिसांनी १२२ वाहनधारकांवर केलेली कारवाई संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. वाहतूक पोलिसांनी पकडलेली वाहने वेगळी, पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडलेली वाहने वेगळी, कोल्हापूर-सांगली मार्गावर बस स्टॅंड समोरील चेकपोस्टवर पकडलेली वाहने वेगळी, प्रत्येकाने आपापल्या आखत्याऱ्यात पकडलेल्या वाहनामुळे प्रत्येकांचे वेगळे दंड. वसुली केंद्र निर्माण झाल्यामुळे वाहने पकडली किती आणि दंडात्मक कारवाई झाली किती यांचा पत्ताच लागत नसल्याने पोलीसच बुचकळ्यात पडले आहेत.