कोल्हापूर : जिल्हा उपनिबंधकांनी गुरुवारी (दि. १२) कारवाई केलेल्या खासगी सावकारांपैकी काहींची शुक्रवारी कसून चौकशी करण्यात आली. रूपेश सुर्वे यांची चौकशी पूर्ण झाली असून आज, शनिवार व सोमवारी (दि. १६) उर्वरित लोकांची चौकशी करून अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर सकृत्दर्शनी दोषी आढळणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार असून, ज्यांच्या चौकशीत अस्पष्टता आहे, त्यांची साहाय्यक निबंधकांमार्फत फेरचौकशी केली जाणार आहे.खासगी सावकरांकडून पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी गुरूवारी दिवसभर कोल्हापूर शहरासह मुरगूड, चिमगाव, कूर, मुदाळ, गंगापूर, गारगोटी, राधानगरी येथील विनापरवाना सावकारी करणाऱ्या १२ जणांच्या कार्यालये व घरांवर छापे टाकले. यामध्ये लाखो रुपयांच्या रोकडीसह मुद्देमालही सापडला.
सहकार विभागाच्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. राजारामपुरी येथील नारायण जाधव यांच्याकडे २७ लाख रुपयांची रोकड व तीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. इतर सावकारांकडे ३० कोरे धनादेश, जमीन व मालमत्तांचे २४ खरेदीदस्त, सहा संचकार पत्रे, मालमत्तांपोटी लिहून घेतलेले ४३ बॉँड सापडले.शुक्रवारी सहकार विभागाने संबंधितांविरोधात पुढील कार्यवाही सुरू केली. यामध्ये रूपेश सुर्वे यांची कसून चौकशी केली. उर्वरित लोकांची सोमवारपर्यंत चौकशी पूर्ण करून त्याच दिवशी सायंकाळी अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे. अहवालात सकृत्दर्शनी दोषी आढळलेल्यांवर नियमबाह्य सावकारी केल्याबद्दल थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ज्यांच्या चौकशीत फारसे काही आढळणार नाही, त्यांची साहाय्यक निबंधकांकडून फेरचौकशी केली जाणार आहे.छुपे रुस्तम धास्तावले!ज्यांच्याबाबत तक्रारी आल्या त्यांच्यावरच छापे टाकण्यात आले. मात्र अजूनही छुपे रुस्तम असून त्यांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी दिवसभर अनेक सावकार गायब झाले होते.मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितलेछाप्यामध्ये जे स्टॅम्प सापडले त्याबाबत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागविले आहे. कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेता येतात का? त्या स्टॅम्पची मुदत किती वर्षे असते? याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती सहकार विभागाने संबंधित विभागाकडे केली आहे.दुप्पट व्याजाने आकारणी?खासगी सावकारांनी कागदोपत्री व्याजदर एक दाखविला असला तरी अनेकांकडून दुप्पट व्याजदराने वसुली केल्याची धक्कादायक माहिती चौकशीत पुढे येत आहे. या व्याजदराला अनेकजण बळी पडल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.चौकशीतील प्रश्नावली
- दुसऱ्याच्या नावावरील स्टॅम्प तुमच्याकडे कसे?
- इतरांच्या मालकीच्या मालमत्तांची कागदपत्रे तुमच्याकडे कशी?
- किती लोकांना पैसे दिले, त्यांचा व्याजदर काय लावला?
- किती वर्षांपासून सावकारकी करता?
खासगी सावकारांकडे चौकशी सुरू झाली असून, दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. संबंधित इतर शासकीय विभागांचे याबाबत मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे साधारणत: सोमवारी सायंकाळपर्यंत अहवाल येईल.- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक