कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मंडल तुरुंग अधिकारी उत्तरेश्वर गायकवाड यांच्यावर हल्ल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आज, शनिवारी संशयित सराईत गुंड पिंटू ऊर्फ अमित महादेव भास्कर (वय २६, रा. जवाहरनगर) याला अटक केली.दोन दिवसांपूर्वी उत्तरेश्वर गायकवाड हे फिरण्यासाठी संभाजीनगर-आयसोलेशन रुग्णालय रोड येथे गेले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या तिघा अज्ञातांनी त्यांना स्टम्प व काठीने मारहाण केली व त्यांच्या चारचाकी वाहनाची मोडतोड केली होती. या मारहाणीत गायकवाड जखमी असून, सध्या त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.दरम्यान, तरुंग अधिकाऱ्यावर हल्ला हल्ल्यामुळे पोलीस प्रशासनही चक्रावून गेले होते. हल्ला नेमका कोणत्या कारणासाठी झाला, कोणी केला, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे होते. दरम्यान, गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला कैद्यांना कडक शिस्त लावण्यामधून झाला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी कारागृहातील काही कैद्यांशी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता, खून प्रकरणातील आरोपी व सध्या पॅरोलवर सुटलेला कैदी पिंटू भास्कर याने मारहाण केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला व त्याचे वडील महादेव भास्कर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. एका खूनप्रकरणी या दोघांसह त्यांचा भाऊ अमोल भास्कर हे कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. तुरुंग अधिकारी गायकवाड हे कैद्यांना शिस्त लावतात. त्यांची शिस्त कैद्यांना मान्य नव्हती. या कारणातून पिंटू भास्कर व गायकवाड यांच्यामध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी पिंटू व त्यांचे वडील पॅरोलवर सुटले होते. त्यानंतर पिंटू भास्करने गायकवाड यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यानुसार त्याने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याची कबुली पोलिसांना दिली. शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनीही त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्याने कोणत्या कैद्याच्या सांगण्यावरुन मारहाण केली, याबाबत मात्र पोलिसांनी गोपनीयता ठेवली आहे. (प्रतिनिधी)
तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला; गुंड भास्करला अटक
By admin | Published: September 14, 2014 12:30 AM