कोल्हापूर : फडके प्रकाशनवर शिवाजी विद्यापीठाने फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा, या प्रश्नात छत्रपती घराण्याचा वारस म्हणून मला स्वत: उतरावे लागेल, याची नोंद घ्यावी, असे पत्र खासदार संभाजीराजे यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना सोमवारी दिले.
या प्रकाशनने विद्यापीठाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमावर आधारित २१ अपेक्षित प्रश्नांचे सुपर गाईड प्रसिध्द केले आहे. त्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक मजकूर प्रसिध्द केला आहे. ही बाब इतिहास अभ्यासकांनी माझ्या निदर्शनास आणली. याबाबत या प्रकाशनने माफीनामा दिला असला, तरी ही केवळ एकच चूक गाईडमध्ये दिसत नाही. असंख्य चुका गाईडमध्ये दिसत असून, मराठ्यांचा तेजस्वी व जाज्वल्यपूर्ण इतिहास पुसण्याचे काम केले जात आहे. इतिहासाचे कोणतेही पुरावे अथवा संदर्भ न देता दिशाभूल करणारे लिखाण त्यात आहे. त्यातून भावी पिढ्यांसमोर चुकीचा इतिहास जाणार, हे वास्तव आहे. त्याला वेळीच पायबंद घालण्यासाठी फडके प्रकाशनवर विद्यापीठाने फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी या पत्रात म्हटले आहे.