सांगली : जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आलेली मदत लाटणाºया संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन लेखी तक्रारी दाखल झालेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. चौधरी म्हणाले, महापुराचा जिल्ह्यातील सांगली-मिरज शहरांसह ग्रामीण भागातील १०४ गावांतील सव्वातीन लाख लोकांना फटका बसला आहे. प्रशासकीय पातळीवर पंचनामे, मदतीचे वाटप सुरुच आहे. मात्र या पूरग्रस्तांसाठी आलेली मदत इतरांनीच लाटली आहे, अशा दोन तक्रारी प्रशासनाकडे दाखल झालेल्या आहेत. पूरग्रस्तांची मदत लाटणाºया समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय आणखी कोणी सामाजिक संस्था, उद्योजकांची मदत लाटत आहे का, याचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे....अन्यथा ‘त्या’ कंपन्यांवर फौजदारीपूरग्रस्तांना आधार देऊन शासन त्यांचे जीवनमान सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत असताना मायक्रोफायनान्स कंपन्या कर्जदारांकडून जबरदस्तीने कर्जवसुली करत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. मायक्रोफायनान्स कंपन्यांनी पूरबाधितांकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वसुली करू नये, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.