एकनाथ पाटील : कोल्हापूर: घनदाट जंगल, डोंगरकडे आणि स्मशानशांतता असलेला परिसर म्हणून गिरोली परिसराकडे पाहिले जाते. अश्लील चाळे करणारे या परिसराकडे नेहमी वळत असतात. हिंस्र प्राण्यांसह गुन्हेगारी टोळक्यांचा वावर याठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यापूर्वी या परिसरात कोल्हापुरातील एका महिलेचा खून करण्यात आला होता. आता पुन्हा बालिकेचा खून झाल्याने गिरोली घाट गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे. खून, लूटमारीच्या घटनांमुळे येथील नागरिक भयभीत झाले असून, कोडोली पोलिसांचे या परिसराकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. त्यांनी वेळीच दक्ष राहून या परिसरात दिवस-रात्र गस्त घालण्याची गरज बनली आहे. केर्ले-कुशिरे-पोहाळेमार्गे जोतिबा आणि वारणा-कोडोलीकडे जाताना गिरोली परिसर लागतो. सुमारे १६ किलोमीटर अंतर असलेला हा नागमोडी घाटरस्ता दोन्ही बाजूंनी जंगलव्याप्त आहे. एका बाजूला उंच डोंगरकडे तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांचा श्वास रोखला जातो. हिंस्र प्राण्यांचा वावर या ठिकाणी असल्याने एकटे-दुकटे कोणी जाण्याचे धाडस करत नाही. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशानशांतता असते. निर्जन आणि निसर्गसौंदर्य परिसर म्हणून गिरोली परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर वाढू लागला. त्यातून निर्जनस्थळी आलेल्या प्रेमीयुगुलांना लुटण्याचे प्रकार वाढू लागले. काही वर्षांपूर्वी याठिकाणी एका महिलेला खून झाला होता. पोलीसही या परिसराकडे कधी फिरकत नाहीत. त्यामुळे या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गासाठी वापर करत आहे. नुकत्याच झालेल्या बालिकेच्या खूनप्रकरणाने पुन्हा हा परिसर प्रकाशात आला आहे. या परिसरातील जाखले, केखले, पोखले, कुशिरे, पोहाळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. दिवसा गुरे चारण्यासाठी जाणारे गुराखेही चक्रावून गेले आहेत. हा परिसर कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतोे. परंतु येथील पोलीस या परिसरात कधी गस्त घालताना दिसत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. गिरोली घाटातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालायचा असल्यास कोडोली पोलिसांनी दक्ष राहून दिवस-रात्र पेट्रोलिंग करणे गरजेचे आहे.परिसरात पोलीस तळ ठोकून ती बालिका कोण? कोठून आली? राहते कोठे? तिचा खून करण्यामागे मारेकऱ्यांचा हेतू काय असावा? या प्रश्नांनी पोलिसांबरोबर येथील स्थानिक लोक चक्रावून गेले आहेत. क्राईम ब्रँचसह कोडोली व पन्हाळा पोलीस या परिसरात तळ ठोकून आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे ते बारकाईने चौकशी करत आहेत. मारेकऱ्याने अतिशय थंड डोक्याने खून केल्याचे प्रत्यक्ष घटनास्थळावरून दिसून येत आहे. खून झालेली बालिका कोल्हापूर परिसरातील नसून ती बाहेरील जिल्ह्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जोतिबाला येणाऱ्या एखाद्या भाविकाने हे कृत्य केले असावे का, त्यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. कुशिरे-पोहाळे मार्गावरील गिरोली परिसर हा निर्जन आणि जंगलव्याप्त आहे. खून झालेल्या बालिकेची पहिल्यांदा ओळख पटविणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर मारेकरी शोधणे सोपे जाईल. परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. - अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक कागलमधून आणखी एक बालिका बेपत्ता कागलमधून पाच-सहा वर्षांची एक बालिका बेपत्ता झाली आहे. तिची वर्दी कागल पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या बालिकेच्या नातेवाइकांना बोलावून घेत खून झालेल्या बालिकेचे फोटो व कपडे दाखविले. परंतु ‘ती’ बालिका त्यांची नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे पोलीस आता बाहेरील जिल्ह्यातील बेपत्ता बालिकांची माहिती घेत आहेत.
गुन्हेगारांची वाट...गिरोली घाट
By admin | Published: November 18, 2014 10:27 PM