कोल्हापूर : काेरोनामुळे घरात बंदिस्त झालेल्या चेतना विकास मंदिरामधील १६ दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी स्मार्टफोनची भेट मिळणार आहे. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शाळेने हे पाऊल उचलले. यापैकी सहा फोन खरेदी करण्यात आले आहेत. उर्वरित स्मार्टफोनसाठी समाजातील दानशूर व्यक्तींचा हातभार लागणे गरजेचे आहे.
शेंडापार्कमधील या शाळेत २०० दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जाणिवा जागृत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याचे काम येथे केले जाते. मात्र दीड वर्षापूर्वी कोरोना संसर्ग सुरू झाल्याने शाळा बंद ठेवावी लागली. तरीही वर्षभरात शिक्षक-पालकांशी संपर्क साधून मुलांकडून विविध उपक्रम करून घेत होते. ऑनलाईन शिक्षणातून त्यांची भेट होत होती. पालक मुलांचा व्हिडिओ करून शाळेला पाठवीत होते. मात्र या १६ विद्यार्थ्यांकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. याची विचारणा केल्यावर लक्षात आले की, त्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत आणि ते घेण्याची आर्थिक क्षमतादेखील नाही. या कारणामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शाळेनेच त्यांना स्मार्टफोन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला प्रतिसाद देत तीन दानशूर व्यक्तींनी प्रत्येकी एक-एक मोबाईल देण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या शाळेने सहा स्मार्टफोन खरेदी केले असून, ते १५ ऑगस्टच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकांना देण्यात येणार आहेत. अन्य विद्यार्थ्यांनाही हे फोन मिळावेत यासाठी मदतीची गरज आहे.
---
कायाकल्प प्रकल्प
संस्थेतील मुलांची प्रतिकाशक्ती वाढावी यासाठी टेरेंट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्यातून मुलांसाठी ‘कायाकल्प’ हा आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मुलांची शारीरिक तपासणी, रोज सकाळी उकडलेली कडधान्ये, बदाम, मनुके, शेंगदाणे-राजगिऱ्याची चिक्की, व्हिटॅमिन सी, डीच्या गोळ्या देण्यात येणार आहेत.
--