कोल्हापूर : अपंगांच्या विविध मागण्या प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ ‘प्रहार अपंग क्रांती आंदोलना’तर्फे सीपीआर, महापालिका आणि जिल्हा परिषदेवर शुक्रवारी हल्लाबोल केला़ दसरा चौक येथून आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. आक्रमक मोर्चेकऱ्यांमुळे अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली़ जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय अधिष्ठाता, आयुक्त, उपायुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आमदार कडू व मोर्चेकऱ्यांनी धारेवर धरले़ त्यामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली़ दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यास आमदार कडू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दुपारी एकच्या सुमारास या मोर्चास सुरुवात झाली़ यामध्ये महिला व पुरुषही सहभागी झाले होते़ ‘अपंगांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा,’ अशा घोषणा देत हा मोर्चा ‘सीपीआर’ येथे आला़ आंदोलक थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस़ एस. साठे यांच्या केबिनमध्ये घुसले़ अपंगांसाठी एक खिडकी योजना नाही, आॅनलाईन दाखले मिळत नाहीत, सीपीआरच्या आवारात व्हीलचेअर नाही, सीपीआर कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही, अशा तक्रारींचा पाढाच अपंगांनी वाचला़ व्हीलचेअर ठेवणे हा विषय माझ्या अखत्यारित नाही, असे उत्तर साठे यांनी दिल्यामुळे आमदार कडू यांनी शिवीगाळ करीत त्यांची कानउघाडणी केली़ यावर साठे यांनी ‘शिवीगाळ करू नका,’ असे सांगताच आमदार कडू यांनी त्यांच्यावर हात उगारल्यामुळे तणाव निर्माण झाला़ त्यातच आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केल्यामुळे गोंधळ माजला. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्येही शाब्दिक चकमक उडाली़ आॅनलाईन दाखले देण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय उठणार नाही, असा पवित्रा कडू यांनी घेतला़ यावेळी अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांनी अपंगांना आॅनलाईन दाखले देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले़ त्यानंतर घोषणाबाजी करीत आंदोलक महापालिकेकडे वळले. आंदोलकांची आक्रमकता पाहून महापालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी गेट बंंद करून घेतले़ त्यामुळे संतप्त आंदोलकांनी अक्षरश: गेटवरून चढून आत प्रवेश केला़ पालिकेच्या प्रांगणात अपंग बांधवांनी ठिय्या मांडत गेली चार वर्षे न दिलेला तीन टक्के निधी त्वरित देण्याची मागणी केली़ निवेदन घेण्यासाठी आयुक्तांनी स्वत: यावे, असा पवित्रा घेतला़ सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांनाही त्यांनी फैलावर घेतले. यावेळी आयुक्त पी़ शिवशंकर, उपायुक्त विजय खोराटे व नगरसेवक आदिल फरास यांनी आंदोलकांची समजूत काढली़ यावेळी पालिकेकडील सन २०११-२०१६ या कालावधीच्या अपंगांच्या तीन टक्के निधीचे पंधरा दिवसांत वितरण, पालिकेच्या एकूण गाळ्यांपैकी तीन टक्के गाळ्यांचे वाटप व अपंग नोंदणीसाठी अभियान राबविण्याचे लेखी आश्वासन कडू यांनी आयुक्तांकडे मागितले. या मागण्या त्वरीत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन आयुक्तांनी दिले. आंदोलकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे अपंगांचा तीन टक्के निधी त्वरित द्यावा, वस्तूऐवजी रोख रक्कम द्यावी, ग्रामपंचायतीच्या गाळ्यांपैकी तीन टक्के गाळे अपंगांना द्यावेत, आदी मागण्यांचे निवेदन दिले. या मागण्या त्वरीत पूर्ण करण्याचे आश्वासन सुभेदार यांनी दिले. या मोर्चात प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पायमल, संजय पवार, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना वावरे, विकास चौगले, तुकाराम पाटील, प्रशांत म्हेतर, उमेश चटके, गणेश बोलाईलकर, विनायक सुतार, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)जिल्हा शल्य चिकित्सकांचा हात धरला‘सीपीआर’च्या आवारात व्हीलचेअर ठेवण्यास सीपीआर प्रशासन टाळाटाळ करते, असा मुद्दा अपंगांनी मांडला, तेव्हा ‘हा विषय माझ्या अखत्यारित नाही,’ असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे यांनी सांगताच आमदार बच्चू कडू यांनी डॉ. साठे यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर हात उगारला. यावेळी डॉ. साठे यांनी शिवी देऊ नका, असे कडू यांना सांगताच अपंग आंदोलकांनी साठे यांचा हातच पकडला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना रोखले. आंदोलकांनी सुमारे तासभर डॉ. साठे यांच्या कक्षात गोंधळ घातला.
सीपीआरवर अपंगांचा ‘प्रहार’
By admin | Published: August 14, 2015 11:23 PM