राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकीकडे नैसर्गिक संकटाने पोल्ट्रीधारक ग्रासले असताना, दुसऱ्या बाजूला व्यापारी त्यांना राजरोसपणे लुटत आहेत. पोल्ट्रीधारकांवरील संकट म्हणजे व्यापाऱ्यांना लुटीसाठी सुगीच येते. बर्ड फ्लूच्या भीतीचे अस्त्र दाखवून आता ५० रुपये किलोने पक्ष्यांची खरेदी करून दुकानदारांना ८० रुपये किलोने विक्री केली जाते. हाच पक्षी ग्राहकांच्या पदरात मात्र १२० रुपये किलोने पडतो. शेतकरी टू ग्राहक यामधील साखळीत तब्बल ७० रुपये मुरतात.
बर्ड फ्लूचा आजार आला असे समजताच, कोंबड्यांचे दर पडण्यास सुरुवात झाली आहे. या आजाराची महाराष्ट्रात तीव्रता किती आहे? कोल्हापुरात तो पोहोचला का? हे समजायच्या आतच व्यापारी मंडळी जाणीवपूर्वक या संकटाचा कांगावा करत सुटले आहेत. पक्ष्यांची विक्री करा अन्यथा तुम्ही अडचणीत याल, अशी भीती घालत असल्याने शेतकरी भीतीपोटी पोल्ट्री मोकळ्या करू लागले आहेत. या संकटाचा फायदा घेत व्यापारी ४० ते ५० रुपये किलो दराने पक्षी खरेदी करू लागले आहेत. तीन किलोचा पक्षी तयार होण्यासाठी साधारणत: ४५ ते ५० दिवस लागतात. त्यासाठी खाद्य, औषध व देखभालीचा खर्च २०० रुपये येतो. मात्र हाच पक्षी १५० रुपयांना विक्री करावा लागत आहे. अशा प्रकारे बर्ड फ्लूची भीती दाखवून शेतकऱ्यांची लूट सुरू असताना, शासकीय यंत्रणेचे मात्र, या शेतकऱ्यांशी आमचा काहीच संबंध नसल्यासारखे वर्तन आहे. (उत्तरार्ध)
जुने व्हिडीओ सोशल मीडियावर
महाराष्ट्रात यापूर्वी २०१६ मध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यावेळी जिवंत पक्ष्यांना गाडण्यात आले होते. त्यावेळचे व्हिडीओ आता सोशल मीडियावरून व्हायरल केले जात असल्याने शेतकरी अधिकच भयभीत झाले आहेत.
ऐन किंक्रांतीत पोल्ट्रीधारकांवर ‘संक्रांत’
थंडीच्या काळात ब्रॉयलर कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यातच किंक्रांतीचा सण आल्याने मागणी वाढते आणि दर तेजीत असतो. मात्र यंदा ऐन किंक्रांतीत पोल्ट्रीधारकांवर ‘संक्रांत’ आली आहे.
वीस दिवसांचे पक्षी कटिंगला
एरव्ही ४५ ते ५० दिवसांचा म्हणजेच तीन किलोचा पक्षी कटिंगला येतो. मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने २० ते २५ दिवसांची पिले कटिंगला येत आहेत.
पोल्ट्रीधारकांचे विस्कटलेले गणित-
एका पिलाचा दर - ४८ रुपये
खाद्य (४५ दिवस) - १४० रुपये
औषध खर्च - १० रुपये
इतर खर्च - ५ रुपये
एकूण खर्च - २०३ रुपये
विक्रीतून मिळणारे पैसे - १५० रुपये
पोल्ट्रीधारकांना पॅकेज देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार - राजू शेट्टी
कोल्हापूर : गेली दोन वर्षे विविध संकटांनी पोल्ट्रीधारक शेतकरी उद्ध्वस्त झाला असून त्याला सावरण्यासाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज द्यावे, यासाठी आपण येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘कडकनाथ’मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली, यामध्ये पोळलेल्या शेतकऱ्यांच्या पैशाचे प्रश्न असताना, लॉकडाऊन काळात कोंबड्या फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यावेळीही नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता बर्ड फ्लूचे नव्याने संकट आल्याने कोंबड्यांचे दर कोसळले आहेत. आता राज्य शासनाने बघ्याची भूमिका न घेता मदत करण्याची गरज आहे. लाखो रुपयांची कर्जे काढून व्यवसाय उभे केले, त्यांचे व्याज माफ करण्याबरोबरच पोल्ट्री व्यवसायासाठी पॅकेज द्यावे, यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.