कोल्हापूर : चाळीस वर्षे ज्यांच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात ओळख निर्माण झाली. त्या बापालाच आता रस्त्यावर आणणाऱ्यांना ठोकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले. सत्ता, पैशाच्या विरोधात आपणाला लढायचे आहे, पण घाबरू नका. टाचा घासून मरूया, पण कामासाठी कोणाच्या दारात जाऊ नका, असेही त्यांनी सांगितले.राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (शरद पवार गट) रविवारी आयोजित बैठकीत ते बोलत हाेते. शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, प्रवाहाच्या उलट दिशेने जाताना थोडा त्रास होतो, पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी आपणाला लढायचे आहे. ज्यांना थांबायचे आहे, त्यांनी थांबावे नाहीतर आताच सत्तेच्या बाजूने जावे.माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, शरद पवार यांच्या नावावर जोगवा मागून मोठे झालात, मतदारसंघात विकास केला. महापुरुषांचे विचार सांगायचे आणि गद्दारी करायची, हे कोण खपवून घेणार नाही, काळ तुम्हाला माफ करणार नाही.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुकुंद देसाई, शिवानंद माळी, ॲड. आबा पाटील, पद्मजा तिवले, हिदायत मणेर, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, शिवानंद तेली, जहिदा मुजावर, सरोजनी जाधव, अनिल घाटगे, दत्ता गाडवे, राजाराम कासार, जयकुमार शिंदे, चंद्रकांत वाकळे, नितीन जांभळे, मदन कारंडे, अमर चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले.भाजपमध्ये येणारे ‘ते ’ कोण?राजकारणाची बुरजी करणाऱ्यांना जनता माफ करणार नसल्याचे सांगत कागलचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद माळी म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील हे, कोल्हापुरात बडा नेता भाजपमध्ये येणार असल्याचे ते सांगत होते. ‘तो’ नेता कोण? हे पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला सांगावेच.बहुजनांचे नेतृत्व संपवलेसदाशिवराव मंडलीक, बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर, निवेदिता माने यांना राष्ट्रवादीत त्रास देऊन जिल्ह्यातील बहुजनांचे नेतृत्व संपवण्याचे पाप काही मंडळींनी केले. मात्र त्यांना जनता माफ करणार नसल्याचा इशारा शिवाजीराव खोत यांनी दिला.सत्तेच्या कुरणातील दोन गवेगेली २५ वर्षे जिल्ह्यात सत्तेच्या कुरणात दोन गवे शरद पवार यांनी मोकळे सोडले होते. त्या गव्यांनीच विश्वासघात केल्याची टीका खोत यांनी केली.रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावारविवारी (दि. १६) कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्ये क्रियाशील सभासद व पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. त्यानंतर पूर्ण तयारी करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा मेळावा घेतला जाईल, असे व्ही. बी. पाटील यांनी जाहीर केले.
बापाला रस्त्यावर आणणाऱ्यांना ठोकण्यासाठी सज्ज राहा, कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 12:57 PM