नानासाहेब जाधव भादोले : भादोलेत वारणा नदी परिसरातील मगरीस अखेर गावातील युवक, वनविभाग व निसर्गप्रेमी यांनी जेरबंद केली. सुमारे आठ फुट लांबीची ही मगर असून वनविभागाने ती ताब्यात घेतली आहे. मगरीच्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान इसाबंदी नावाच्या याच परिसरात आणखी एक मगर असून वनविभागाने ती पकडावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.इसाबंदी नावाच्या शेतात शंकर यादव यांच्या शेतालगत पाण्याच्या खड्ड्यात दोन मगरीचे वास्तव्य होते. या मगरी खड्ड्यातून बाहेर येवून शेतात फिरत होत्या. यामुळे शेतकरी भीतीने शेतात जाण्याचे टाळत होते. दरम्यान काल, सोमवारी मध्यरात्री शेतात मोटार सुरु करायला गेल्यानंतर शेतकरी व मुख्याध्यापक रघुनाथ नांगरे व संजय पाटील यांना मगर दिसली. यावेळी त्यांनी गावातील युवकांना बोलावून वनविभागास देखील याबाबत माहिती दिली.यानंतर गावातील युवक, वनविभाग व निसर्गप्रेमी यांनी या मगरीस पकडले. अन् वन विभागाच्या ताब्यात दिली. यावेळी वन्य जीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार, स्वप्नील शहपुरे, वैभव आवळे, सागर भोकर, समर्थ सांगळे, अजय यादव, रोहन शिंदे, शितल ताटे, मदन बांगे, ओंकार पाटील, शेतकरी रघुनाथ नांगरे, तानाजी पाटील, भाऊ यादव, हर्षवर्धन पाटील, अमर पाटील, शंगार पाटील यांनी मगर पकडण्यास सहकार्य केले. ही मगर वन्य जीव अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Kolhapur: भादोलेत वारणा नदी परिसरात पकडली मगर, वन विभागाच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 4:43 PM