नांगनूर येथे मगरीचे दर्शन : नागरिकांत घबराट
हलकर्णी : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील गोटुरे बंधाऱ्याजवळ हिरण्यकेशी नदीपात्रात मगरीचे दर्शन झाले. बुधवारी सकाळी ही मगर अरळगुंडी-नांगनूर सीमेवरील डॉ. भिडे यांच्या शेताजवळ नदीपात्राबाहेर पहुडली असल्याचे नांगनूर येथील शेतकरी रायगोंडा नार्वेकर यांच्या निदर्शनास आले. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.
खणदाळ ते नांगनूर परिसरात हिरण्यकेशी नदीचे विस्तारित पात्र आहे. मात्र यापूर्वी या भागात मगरीचे दर्शन झाले नव्हते. नार्वेकर हे गवत कापण्यासाठी सकाळी गेले असता साधारण ८ फूट लांबीची ही मगर दिसून आली. पात्राबाहेर ज्या परिसरात मगरीचा वावर होता, त्या परिसरात गवत आडवे झाले होते. नार्वेकर यांची चाहूल लागताच मगर पुन्हा पाण्यात गेली.
ही बातमी गावासह परिसरात समजताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सध्या नदीपात्रात पाणी भरपूर आहे. त्यामुळे येथे महिलांची धुणे धुण्यासाठी व नांगनूर ग्रामस्थांची जनावरे धुण्यासाठी गर्दी असते. त्यामुळे खबरदारी घेण्याची सूचना वन विभागाने दिली आहे.
दरम्यान, दुपारी २ वाजता गडहिंग्लज वन विभागाने मगर दिसलेल्या ठिकाणाची पाहणी केली असता, त्यांनाही ही मगर दिसून आली.
--------------------------
फोटो ओळी :
नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधाऱ्यानजीक पहुडलेल्या स्थितीत दिसलेली मगर.
क्रमांक : ०३०२२०२१-गड-०३