खोची :
हातकणंगले तालुक्यातील खोची बंधाऱ्याजवळ असणाऱ्या बाबर वस्तीत नऊ फूट लांबीची मगर अत्यंत शिताफीने युवकांनी पकडली. खोची येथील धाडसी युवक, सर्पमित्र तेजस जाधव, अमोल सुतार, अमर चव्हाण, अमोल मगदूम, अमोल चव्हाण (टोप), सांगली रेसक्यू टीमचे सचिन साळुंखे, विशाल चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी ही मगर पकडली.
खोची-दुधगाव दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हा बंधारा आहे. बंधाऱ्यालगत बाबर समाजातील नागरिकांची जनावरांसह वस्ती आहे. या ठिकाणी सोमवारी रात्री ९ वाजता ही मगर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना दिसली. त्यानंतर ही माहिती गावातील नागरिकांसह या तरुणांना समजली. त्यांनी या ठिकाणी धाव घेऊन मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या मदतीला सांगलीतील रेस्क्यू टीपचे सदस्य आले. त्यांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर उसाच्या शेतात मगरीला बंदिस्त केले. नरंदे वन विभागाचे वनपाल साताप्पा जाधव, वनरक्षक राहुल जोनवाल, प्रदीप सुतार, मदन बांगे यांच्या ताब्यात देण्यात आली.
ही मगर अंडी घालण्यासाठी नदीपात्रातून बाहेर आली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
०९ मगर
खोची-दुधगाव बंधाऱ्याजवळील बाबर समाजाच्या वस्तीत नऊ फूट लांबीची मगर जेरबंद करण्यात आली.