दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने आजरा तालुक्यातील ऊस व भात पिकांचे अंदाजे ३०० ते ३५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नदी व ओढ्याचे पाणी बांध तोडून पिकात घुसल्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील १४८ घरांची पडझड झाली असून अंदाजे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.
पावसाने व्हिक्टोरीया पुलावर सर्वत्र खड्डे पडल्यामुळे पुलाला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने हाजगोळी बंधाऱ्याशेजारी रस्त्यावर खड्डा पडला आहे. आजरा-कोल्हापूर रस्त्यावरील मुंमेवाडीजवळही रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. चाफवडे येथील नवीनच बांधलेल्या पुलाचा भराव वाहून गेला आहे. जेऊर ओढ्यावरील पुलाचा भराव वाहून गेल्यामुळे नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागत आहे.
पावसाने तालुक्यातील ८८ कुटुंबातील ३६० नागरिकांना त्यांच्या जनावरांसह स्थलांतरित केले आहे. आजपर्यंत तालुक्यातील १४८ घरांची पडझड झाली असून अंदाजे ३५ लाखांचे नुकसान झाले.
गवसे येथील सचिन पाटील यांच्या गॅस गोडाऊनची संरक्षक भिंत कोसळल्याने तर निंगुडगे येथील सुनंदा धोंडीबा कांबळे यांचे संपूर्ण घर पडल्यामुळे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे. करपेवाडीतील शेतकऱ्याची म्हैस वाहून गेल्याने ती आंबेओहोळच्या धरणात झाडाला अडकून बसली होती.
कुक्कुटपालन शेडमध्ये पावसाचे पाणी जाऊन तालुक्यातील अंदाजे १३ हजार कोंबड्या दगावल्या आहेत. सोहाळे, साळगाव व मडिलगे गावात पुराचे पाणी घुसले तर गजरगाव गावाला हिरण्यकेशी नदीच्या पुरामुळे बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शेतांमध्ये पाण्याबरोबर दगड-गोटे वाळू येऊन पिकांवर पडली आहेत. याचा सर्वात जास्त फटका ऊस व भात पिकाला बसला आहे.
फोटो ओळी :
गवसे (ता. आजरा) येथे शेतात पुराचे पाणी घुसून झालेले ऊस पिकांचे नुकसान झाले आहे.