चंदगड : तालुक्यात हत्तींचा कळप कायमच वास्तव्यास असला तरी अलीकडेच आलेला एक टस्कर आण्णा आणि त्याच्या दोन पिल्लांनी कळसगादे, पार्ले, जेलुगडे परिसरात धुमाकूळ घातला असून उसाचे मोठे नुकसान केले आहे. ऐन सुगीत हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असलेले पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. चंदगड तालुक्यात हत्तीचा वावर या भागात ठरलेला असतो. दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होते. नुकसान भरपाई वेळेत कधीच मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. उत्पादन खर्चाइतकाही दर पदरात पडत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे. वनविभाग सातत्याने हत्ती आपल्या कार्यक्षेत्रात सांभाळण्यात असमर्थ ठरले आहे. वनविभागाकडे पंचनाम्याशिवाय अन्य कोणतेच काम उरलेले नाही. हत्ती पिटाळून जंगलक्षेत्रात पाठवण्यात ते कमी पडत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून जांबरे, नागवे, उमगाव, कळसगादे, गुडवळे, पार्ले परिसरात हत्तींचा वावर आहे. गेल्या दोन दिवसांत कळसगादे गावातील खेमाना दळवी, गोविंद दळवी, पुंडलिक दळवी, ज्ञानेश्वर दळवी, भिकाजी दळवी, अनिल दळवी, संतोष दळवी या शेतकऱ्यांचेविशेषतः रायीकडच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस खाण्यापेक्षाही त्याच्या नाचण्याने मोठे नुकसान होत आहे.वास्तविक पाहता तालुक्यातील साखर कारखान्यांनी अग्रक्रमाने हत्तीबाधित क्षेत्रातील उसाची उचल करणे आवश्यक आहे. शेतकरी हत्तींच्या वाढत्या वावराने हतबल झाला असून त्यांना वनविभाग, साखर कारखाने यांच्या सहकार्याची गरज असून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे आवश्यक आहे.गणेश नावाचा टस्करही कलिवडे, किटवडे व जंगमहट्टी धरण परिसरात असून त्याच्याकडूनही पिकांचे नुकसान सुरू आहे. त्यामुळे वनविभागाने हत्ती हाकारा पथकाच्या मदतीने आमच्या पिकांचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.
Kolhapur: ऐन सुगीत चंदगड तालुक्यात टस्करासह पिल्लांचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 1:03 PM