लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी व महापुराने बाधित शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला.
सरकारी पंचनाम्यानुसार ३० ते ५० टक्क्यांदरम्यान पिकांचे नुकसान झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्ज व त्यावरील व्याजाचे दोन वर्षांसाठी पुनर्गठन केले जाणार आहे. त्यापैकी एक वर्ष सवलतीचा कालावधी आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाधित क्षेत्रासाठी नवीन पीककर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे, तसेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त पिकाचे नुकसान झालेल्या कर्जदार शेतकऱ्यांच्या अल्पमुदत व त्यावरील व्याजाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन केले जाणार आहे. यामध्येही एक वर्ष कालावधी सवलतीचा व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाधित क्षेत्रासाठी नवीन पीककर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या योजनेत नैसर्गिक आपत्तीवेळी थकबाकीत असलेले कर्ज वगळता पीककर्जासह अल्प मुदतीची कर्जे पुनर्रचनेसाठी पात्र आहेत. अल्पमुदत कर्ज व त्यावरील देय व्याज पुनर्गठित केले जाणार आहे. कर्ज असलेली शेती उपकरणे व साधनांचेही पुरामुळे नुकसान झाले असल्यास त्यांनाही मागणीनुसार नवीन कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही जादा तारण घेतले जाणार नाही. बैठकीला संचालक आमदार पी.एन. पाटील, राजेश पाटील, राजू आवळे, निवेदिता माने, सर्जेराव पाटील- पेरीडकर, पी.जी. शिंदे, विलास गाताडे, अनिल पाटील, आर.के. पोवार, अशोक चराटी, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, असीफ फरास, संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने उपस्थित होते.
पूरबाधित दुकानदारांनाही मिळणार दिलासा...
जिल्हा बँक पूरबाधित दुकानदारांनाही दिलासा देणारी योजना लवकर आणणार आहे. या योजनेला संचालक मंडळाच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. यासंदर्भात बँक लवकरच धोरण ठरविणार आहे.