कोल्हापूर : आठवडाभर पावसाने बऱ्यापैकी दडी मारल्याने राज्यभर दुबार पेरणीचे संकट गडद होत असताना कोल्हापुरात मात्र अधूनमधून येणाऱ्या सरी व ढगाळ वातावरणामुळे पीक पाणी उत्तम आहे. त्यामुळे जिल्हा दुबार पेरणीपासून कोसो दूर आहे. आहे ती पिके पावसाने उघडीप दिल्याने बऱ्यापैकी तरारली असून आंतरमशागतीची कामे जोरात सुरू असल्याने शेतकरी समाधानी आहे.
राज्यभर माॅन्सूनने विश्रांती घेतल्याने दुबार पेरणीच्या संदर्भात कृषिविभागाने नजरअंदाज पाहणी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाने तालुकानिहाय आढावा घेतला असता, सध्यस्थितीत कोठेही दुबार पेरणीची शक्यता नसल्याचा अहवाल आला आहे. सलग पाच-सहा दिवस पाऊस पडल्याने आणि पुरात पिके अडकल्याने काहीसे नुकसान झाले आहे पण त्यानंतर ऊन पडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.
जिल्ह्यात आजच्या घडीला ७५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र तरवे लागण जास्त पाऊस नसल्याने अद्याप फारशी वेगाने होत नसल्याने ही अजून २५ टक्केवरील पेरा शिल्लक राहिल्याचे दिसत आहे. नाचणीचा पेरा अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे. याशिवाय ज्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत, त्या विशेषता आडसाली लागणीच्या आहेत.
प्रतिक्रिया
तालुकापातळीवर कृषी अधिकारी व सहायकांकडून घेतलेल्या अहवालानुसार सध्या दुबार पेरणीची कोणतीही शक्यता नाही.
ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
चौकट
ढगाळ वातावरण, हलकासा शिडकावा
रविवारी देखील दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले असून हलकासा शिडकावा सोडला तर पावसाने हुलकावणीच दिली आहे. ढग भरुन येत आहेत, पण मोठा पाऊस पडलेला नाही. हवेत मात्र कमालीचा गारवा आहे. हवामान विभागाने देखील असेच अंशता ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.