कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर गेल्या आठवड्यापासून सलग जोरदार पावसाने रोज हजेरी लावल्यामुळे शहर, गांधीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर आदी ठिकाणच्या बाजारपेठेतील खरेदीला ब्रेक लागला आहे. ढगाळ वातावरण, विजेच्या कडकडाटांसह पाऊस पडत असल्याने खरेदीची इच्छा असूनही ग्राहक बाहेर पडणे टाळत आहेत. तासनतास विक्रेते, व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील फेरीवाल्यांचे तर बेहाल झाले आहेत. जनजीवन गारठून जात आहे.दसरा झाल्यानंतर दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने बाहेर पडतो; पण आठ दिवसांपासून रोज उसंत घेऊन जोरदार पाऊस कोसळत आहे. सकाळी घराबाहेर पडताना आणि सायंकाळी, रात्री घरी जाताना मुसळधार पाऊस पडत ग्राहक खरेदीचा बेत पुढे ढकलत आहेत. जरा ऊन पडू दे मग खरेदी करू, अशी अनेकांची मानसिकता तयार होत आहे. जे खरेदीसाठी बाहेर पडत आहेत, ते पावसात अडकून पडत आहेत.दवाखाने फुल्लप्रतिकूल हवामानामुळे साथ आणि इतर आजारांनी डोके वर काढल्याने खासगी, सरकारी दवाखाने फुल्ल दिसत आहेत. ज्येष्ठ आणि बालकांंमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गरमागरम चहा, भजी, भडंग खाण्यासाठी गर्दी दिसत आहे.नियोजित सेलच्या तारखा पुढे ढकलल्या..तयार कपडे, चप्पल, बुट, लहान मुलांचे कपड्याचे सेलसाठी शहरातील मंगल कार्यालय, हॉटेलमधील हॉल बुकिंग केले होते; पण सतत पडणाऱ्या पावसामुळे बुकिंग रद्द करून सेलची तारीख पुढे ढकलणे अनेकांनी पसंत केले आहे.राधानगरीत सर्वाधिक पावसाची नोंद राधानगरी : यंदा राधानगरीत सरासरीपेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण क्षेत्रात गतवर्षी ३७९७ मि.मी. तर यंदा १ जून ते १८ ऑक्टोबरपर्यंत ५८४५ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. काळम्मावाडी ४२९६ मि.मी. तर तुळसी जलाशय ५०३४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने राधानगरी पश्चिम भागातील भात पीक भुईसपाट झाले आहे.कापणीला आलेले पीक पाऊस वाऱ्याने शेतातच झोपले आहे. काही भागांत भात कापले आहेत; पण शेतात असणाऱ्या पिंजराचेही नुकसान होत आहे. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. तर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली.गगनबावडा तालुक्यात बळीराजा चिंतेतगगनबावडा : गगनबावडा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने जोर धरला आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. भात पिकाचे अधिक नुकसान झाले असून जोराचा पाऊस, विजेचा गडगडाट यामुळे परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कापलेले भात शेतात तसेच पडून राहिले असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेती कामात देखील अडथळे निर्माण होत आहेत.चिकोत्रा खोऱ्यात भात, सोयाबीन धोक्यातपांगिरे : चिकोत्रा खोऱ्यात आठवडाभरात जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे पिके भुईसपाट झाली आहेत. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काढण्यात आलेल्या भात व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यास डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. यावर्षी भात पिकासाठी पावसाचे प्रमाण योग्य असे शेतकऱ्यांना वाटत असताना मध्यंतरीच्या कालावधीत उघडीप आणि पुन्हा रिमझिम पावसामुळे शेतकरी सुखावला होता. सध्या भात पीक व सोयाबीन उतारा देईल असे वाटत असतानाच पावसाने दणका दिला. मात्र शेतकऱ्यांनी भात व सोयाबीन काढणीस प्रारंभ केला आहे. परंतु आठवडाभरातील परतीच्या आणि जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे उंच असणारे व काढणीस आलेले भात पीक झडून जमिनीला लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया
सलग पडणाऱ्या जोरदार पावसामुळे ग्राहकांना बाहेर पडण्यात अडचणी येत आहेत. दिवाळी तोंडावर आल्यामुळे आता पूर्णपणे उघडीप पडण्याची प्रतीक्षा ग्राहक आणि व्यावसायिक करीत आहेत. -गिरीश शहा, चेअरमन, गिरीश सेल्स, कोल्हापूररेडिमेड कपड्यांची बाजारपेठ सज्ज आहे; पण पावसामुळे ग्राहकांनी तूर्त तरी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. दुकानांत शुकशुकाट राहत आहे. - मुनवर देवळे, मालक, कॉटन उत्सव, कोल्हापूरअचानक हवामानात बदल झाल्याने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पर्यटक फिरण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत. पर्यटनस्थळांच्या बुकिंगला ब्रेक लागला आहे. - समीर गडकरी, संचालक, ‘अ’ मिरॅकल हॉलीडे, कोल्हापूर.