या भूस्खलनामध्ये अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेणवडे येथील भराडी तर मांडुकली येथील भैरी नावाच्या शेताशेजारी असलेल्या ओढ्याच्या वरती असलेला डोंगर गगनबावडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमध्ये खचला. डोंगर खचून ओढ्याच्या प्रवाहाबरोबर खाली आला आहे. डोंगरातील माती, लहान-मोठी झाडे, मोठमोठे दगड ओढ्याच्या प्रवाहाबरोबर खाली आल्याने ओढ्याने रौद्ररूप धारण केले. ओढ्याचे पात्र बदलून लगतच्या शेतामध्ये माती, छोटे-मोठे दगड व लहान-मोठी झाडे मुळासकट येऊन पडली. मोठा डोंगर खचून आल्याने व ओढ्याने आक्राविक्राळ रूप धारण केल्याने ओढासभोवताली असणाऱ्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मातीमुळे अनेकांच्या शेतात उभे असलेले ऊस पीक, नुकतेच लावलेले भात, वरी व नाचणा ही सर्व पिके गाढली गेली आहेत. एकूणच येथील शेतकऱ्यांचे भूस्खलनामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गगनबावड्याचे तहसीलदार संगमेश कोडे यांनी या नुकसानग्रस्त ठिकाणीची पाहणी केली आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.