आयुब मुल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : मागील चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. महापुराच्या तावडीतून वाचलेली पिके मात्र उन्हाच्या तडाख्यात सापडली आहेत. विद्युत पुरवठा अद्यापही बंद असल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे, तर कोलमडून पडलेली वीज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महावितरणला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विद्युत साहित्याची वानवा असल्याने आहे त्यावरच चालतीस करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीचे मोठे संकट उभे आहे. विशेष म्हणजे वारणाकाठचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बारामतीहून लोकांना पाचारण केले आहे.
जुलैमध्ये महापुराच्या विळख्यात वारणाकाठची शेती बुडाली. खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग ही पिके नामशेष झाली. उसाचा तर सुफडासाफ झाला; परंतु या तडाख्यातून वाचलेली पिके जोमात आली. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. भुईमूगही त्याच परिस्थितीत आहे. त्यांना आता पाण्याची गरज आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे; पण नदीकाठचा विद्युत पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. त्यामुळे पाणी कसे द्यायचे आणि पिके कशी वाचवायची, या चिंतेत शेतकरी आहेत.
सोयाबीन, भुईमूग काढल्यानंतर शेतकरी उसाची लावणी करतो; पण ही पिकेच पुराने गेल्याने मोकळे झालेल्या रानात लावणीशिवाय पर्याय उरलेला नाही, तर आंतरपिकात केलेल्या उसाच्या लावणीसुद्धा पडल्याने दुहेरी नुकसान झाले. या ठिकाणी साफसफाई करून लागण करण्याचा तयारीत शेतकरी आहे; पण त्या लागणी आता पाण्याअभावी खोळंबल्या आहेत. ज्या माळरानात लागणी केल्या होत्या त्या पाणी मिळेना म्हणून तहानलेल्या आहेत.
सेवा संस्थेचे पीककर्ज घेऊन केलेल्या उसाच्या लागणी व अन्य पिके पुरात बुडाली. किमान त्या ठिकाणी पुन्हा दुबार पिके घ्यावीत, उसाची लागण करणे गरजेचे बनले आहे. अशा सर्व परिस्थितीत वीज कधी सुरू होणार याचीच विचारणा शेतकरी करू लागला आहे.
................
ट्रान्स्फॉर्मर बुडाल्याने अडचण
नदीकाठी चिखलाची दलदल आहे. पाणी काही ठिकाणी साचलेले आहे. तिथे पोहोचणे आणि पोल उभा करण्यासाठी खड्डा काढणे कसरत होऊन बसली आहे. सर्व ट्रान्स्फॉर्मर बुडल्याने त्यातील तेल शुद्धीकरण करणे, त्यामध्ये दुसरे ऑइल घालणे, हा प्रकार लगेच होण्यासारखा नाही. विद्युत खांब, डीपीचे पोल तुटून पडल्याने पुन्हा उभे करताना पोल मिळणे मुश्कील झाले आहे. थ्री पेज मीटरही डिजिटल असल्याने पाण्यामुळे पूर्ण खराब झाली आहेत. त्या सर्व ठिकाणी नवीन मीटर बसविणे आजमितीला शक्य नाही. साहित्य, उपकरणांचा तुटवडा आहे. त्यामुळे महावितरण अडथळ्यांचा सामना करीत दुरुस्तीच्या कामात वेग घेऊ लागला आहे.
..............
हातकणंगले तालुक्यात वारणाकाठी सुमारे पाचशे ५ हजार ग्राहकांचे कनेक्शन बंद आहेत. ५०० ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करावे लागणार आहेत. किमान हजार पोल उभे करावयाचे आहेत.
.............
महापुराने विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. पूर ओसरल्यापासून महावितरणचे सर्व कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करीत आहेत. लवकरात लवकर दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी गतीने कामकाज सुरू आहे.
-सचिनकुमार जगताप, उपकार्यकारी अभियंता, पेठवडगाव