देवाळे : कसबा सातवेपैकी शिंदेवाडी, वाळकेवाडी (ता. पन्हाळा) येथील १ कोटी ११ लाखांच्या जलस्वराज्य योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. महत्त्वाची कागदपत्रे गहाळ करून कागदोपत्री प्रकल्प पूर्ण केल्याचे दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी येथील दोन माजी सरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह १२ जणांवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता जगदीश काटकर यांनी कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तत्कालीन सरपंच तथा ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्षा सुमन सतीश नांगरे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एच. जी. निरुखे, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सचिव रंगराव शामराव निकम, महिला सबलीकरण समितीच्या अध्यक्षा मीनाश्री आनंदराव पाटील, सचिव कमल सदाशिव माळी, सामाजिक लेखा समितीचे अध्यक्ष सर्जेराव यशवंत ढेरे, सचिव संगीता विश्वास चौगुले, तत्कालीन सरपंच व खजिनदार संजय वसंतराव दळवी, खजिनदार ज्योती उमेश चौगुले (सर्व रा. कसबा सातवे, ता. पन्हाळा), तांत्रिक सेवा पुरवठादार पी. एस. पाटील (कोल्हापूर), ठेकेदार रामचंद्र महादेव पवार यांच्या पत्नी हिराबाई पवार (रा. पचेगाव, ता. कऱ्हाड), ब्रेन फौंडेशनचे अध्यक्ष दिलीप खोत (रा. देववाडी, ता. शिराळा) या बाराजणांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कसबा सातवेपैकी शिंदेवाडी, वाळकेवाडी (ता. पन्हाळा) येथे २००६-०७ सालात जलस्वराज्य योजना राबविण्यात आली होती. त्यासाठी १ कोटी ११ लाख देण्यात आले होते. त्यापैकी काही रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उपअभियंता जगदीश काटकर यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत. (वार्ताहर)
‘जलस्वराज्य’मध्ये कोटीचा गैरव्यवहार
By admin | Published: January 05, 2015 12:55 AM