कोल्हापूर : भारतीय नौसेना सप्ताहनिमित्त कोल्हापूरच्या चौदा वर्षीय साईश समीर चौगुले याने रविवारी सकाळी उरण येथील मोरा जेट्टी ते गेटवे आॅफ इंडिया हे १६ किलोमीटरचे सागरी अंतर २ तास २८ मिनिटे १५ सेकंदांत पूर्ण करीत भारतीय नौसेनेला मानवंदना दिली. असा उपक्रम करणारा तो पहिला कोल्हापूरकर जलतरणपटू ठरला.या उपक्रमाची रविवारी सकाळी सुरुवात उरण येथील मोरा जेट्टी येथून मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार व आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत झाली. सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी त्याने मोरा जेट्टी येथून पाण्यात उडी घेतली, तर तो ११ वाजून ४३ मिनिटांनी मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया येथे पोहोचला.
ठाण्याच्या स्टारफिश क्लबने त्याचा हा १६ कि लोमीटर सागरी अंतर पोहून पार करण्याचा उपक्रम आयोजित केला होता. गेले महिनाभर साईश सागरी जलतरण करण्याचा खास सराव अरबी समुद्रात करीत होता. त्याच्या उपक्रमासाठी जलतरण प्रशिक्षक नीळकंठ आखाडे, अंकुश पाटील यांनी अपार परिश्रम घेतले. राज्य जलतरण संघटनेने या उपक्रमास मान्यता दिली होती. त्यानुसार निरीक्षक म्हणून अजय पाठक यांनी काम पाहिले.
गेले महिनाभर मी समुद्रात पोहण्याचा सराव करीत होतो. त्याचा फायदा मला १६ कि.मी.चे सागरी अंतर पोहून पार करण्यास झाला. विशेषत: मला नौसेना दिनानिमित्त हे अंतर पोहून देशाला भेट द्यायची होती. त्यानुसार हा उपक्रम मी पूर्ण केला. त्याकरिता वडील समीर चौगुले यांचे प्रोत्साहन, तर नीळकंठ आखाडे, अंकुश पाटील व राज्य जलतरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.- साईश चौगुले,जलतरणपटू