कोल्हापूर : भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अचानक विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’कडे इच्छुकांची गर्दी झाली असून, यामध्ये भाजपच्या नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. स्वत: विनय कोरे आणि समित कदम या सर्वांंशी चर्चा करीत असून जिल्ह्यातील १० पैकी पाच मतदारसंघांत ‘जनसुराज्य’चे उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे.‘जनसुराज्य’चे संस्थापक विनय कोरे हे स्वत: पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी ‘जनसुराज्य’ने निश्चित केली आहे.
या ठिकाणी १५ वर्षांपूर्वी राजीव आवळे हे जनसुराज्यमधून आमदार झाले होते. शेजारच्या शिरोळ तालुक्यातूनही भाजपचे तालुकाध्यक्ष आणि ‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव यांनाही जनसुराज्यने उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे सांगण्यात आले.‘कोल्हापूर उत्तर’मधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. त्याच पद्धतीने चंदगडमधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. २००४ साली याच मतदारसंघातून नरसिंगराव पाटील जनसुराज्यच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र करवीर, कोल्हापूर दक्षिण, कागल, इचलकरंजी, भुदरगडमध्ये जनसुराज्यचा उमेदवार नसण्याची शक्यता आहे.