कोल्हापूर: जिल्हा परिषदेत नागरिकांना प्रवेश बंद असला तरी मार्च अखेरीची बिले काढण्यासाठी बांधकाम आणि वित्त विभागात मंगळवारीही गर्दी कायम राहिली. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात ही सोय करण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी काढले हाेते. पण तिकडे अधिकारी आणि ठेकेदार कोणीही फिरकले नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत या प्रशासकीय कार्यालयांनी उपस्थिती आणि गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या होत्या. त्यानुसार माने यांच्या सहीने जिल्हा परिषदेतील कामकाजाबाबत सोमवारी संध्याकाळी परिपत्रक काढण्यात आले.
त्यानुसार बांधकाम आणि वित्त विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शाहू सभागृहातून कामकाज करावे अशा सूचना दिल्या होत्या. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सभागृह उघडूनही ठेवले होेते. परंतु मंगळवारी सकाळपासून या सभागृहाकडे ना या विभागाचे कर्मचारी फिरकले ना ठेकेदार. त्यामुळे या सर्वांची पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरच गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. स्वत: माने यांनीही जिल्हा परिषदेत घेतलेल्या दक्षतेची पाहणी केली.
प्रवेशव्दारावर सॅनिटायजेशन सुरू होते. परंतु जिल्हा परिषद सदस्यांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना अडवताना कर्मचाऱ्यांची अडचण जाणवत होती. त्यामुळे या ठिकाणी आता कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के उपस्थितीबाबत अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. कारण या कालावधीत बहुतांशी कर्मचाऱ्यांवर कोरोनाविषयक अन्य जबाबदारी दिली जाणार असल्यामुळे आतापासूनच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कपात करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.