कोल्हापूर : मंदिरे खुली झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण दक्षता घेतली असून, भाविकांना तपासणी करूनच मंदिरात प्रवेश दिला जात होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने राज्यातील मंदिरे बंद होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबरपासून मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली. दीपावलीचा सण संपला. मंदिरे खुली झाल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. त्यात मंदिरे खुली झाल्यानंतरचा पहिला रविवार असल्याने कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
अंबाबाई, जोतिबाच्या दर्शनासाठी मंदिराच्या परिसरात रांगा लागल्या होत्या. मंदिर प्रशासनाने सर्व भाविकांना मास्क लावणे बंधनकारक केले आहेच. त्याशिवाय सॅनिटायझरचा वापर, थर्मल मशीनद्वारे तपासणी करूनच दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता.