कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची गर्दी झाली. दर्शनासाठी भाविकांची भवानी मंडपापर्यंत रांग लागली होती. नाताळच्या सुटीमुळे कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली.चौथा शनिवार आणि नाताळच्या सुटी असल्याने कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. शनिवारपासून अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात भाविक येत आहेत. रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी गर्दी कायम राहिली. मंगळवारी सकाळपासून भाविकांची गर्दी झाली. त्यांची रांग भवानी मंडपापर्यंत आली होती. उन्हाळामुळे दुपारी काहीवेळ गर्दी कमी झाली.सायंकाळनंतर भाविकांची संख्या पुन्हा वाढली. अंगारकी संकष्टी असल्याने मंदिरातील सिद्धीविनायक गणेशाचे दर्शन भाविकांनी घेतले. भवानी मंडप, जोतिबा रोड, बिनखांबी गणेश मंदिर आणि महाद्वाररोड मार्गावर पर्यटक, भाविकांनी खरेदीसाठी गर्दी केली.
दरम्यान, याबाबत देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांनी सांगितले की, नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले.
महिला भाविकाला चक्करमंदिरात दर्शनासाठी मंगळवारी आलेल्या कोल्हापूरमधील महिला भाविकाला दुपारी पावणेएकच्या सुमारास चक्कर आली. त्यांना तातडीने देवस्थान समितीच्या प्रथमोपचार केंद्रामध्ये आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले शिवाय त्यांच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली असल्याचे समितीचे व्यवस्थापक जाधव यांनी सांगितले.