कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सोमवारपासून सुरू झाले. घरच्या चवीला कंटाळलेल्या खवय्यांनी पहिल्याच दिवशी हॉटेल्समधील विविध पदार्थांवर ताव मारला.
विशेष म्हणजे अनेक हॉटेल्सचालकांनी प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकासह नोंद घेणाऱ्या व्यक्तीची खास नेमणूक केली आहे. त्यामुळे प्रवेश देतानाचा ग्राहकांना हातामध्ये सॅनिटायझर, नाव, पत्ता, फोन आणि तापमापकाने तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. शिस्त पाळून हॉटेल्समधील पदार्थांवर ताव मारण्यासाठी खवय्यांची दिवसभर गर्दी होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकशे पंचाहत्तर दिवस बंद असलेली जिल्ह्यातील हॉटेल्स , रेस्टॉरंट, फुड कोर्ट, बार सोमवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी शहरातील मोजकीच हॉटेल्स सुरू झाली आहेत, तर काहींचे नूतनीकरण सुरू आहे.
हॉटेल्स सुरू झाल्यानंतर ग्राहकांचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी, शर्तीनुसार हॉटेल व्यावसायिकही क्षमतेच्या पन्नास टक्के टेबल खुर्च्यावर ग्राहकांना प्रवेश देत आहेत. जादा ग्राहकांना प्रतीक्षा करण्यासाठी हॉटेल्स बाहेर बसण्यासाठी खुर्च्यांची सोय केली आहे.