लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतोली बाजारपेठेत अत्यावश्यक खरेदी करण्याच्या नावाखाली सकाळच्या सत्रात आठवडी बाजाराचे स्वरूप निर्माण होत असल्याने सोशल डिस्टन्सचा अक्षरशा फज्जा उडत होता. त्यामुळे गर्दीला आवर घालणार कोण, असा प्रश्न निर्माण झाल्याने कोतोली बाजारपेठेत तोबा गर्दी या आशयाची ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच मंडळाधिकारी सतीश ढेंगे यांनी सकाळच्या सत्रात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त दुकान उघडणाऱ्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास भाग पाडून अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक केल्याने दोन व्यापारी वगळता इतरांच्याकडे निगेटिव्ह अहवाल नसल्याने नेहमी गजबजलेली बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली. त्यानंतर बाजारपेठेत सन्नाटा पसरला.
काही काळ कोरोना चाचणी अट रद्द करण्याची मागणी व्यापारी वर्गातून जोर धरली; परंतु शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे सांगत चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जि.प. सदस्य शंकर पाटील यांनी परिसरात सॅनिटायझर फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला. यावेळी सरपंच पी.एम. पाटील, उपसरपंच राजेंद्र लव्हटे, तलाठी प्रकाश सूर्यवंशी, ग्रामसेवक संजय मस्के, पोलीस पाटील मोरारजी सातपुतेे, महादेव पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : कोतोली (ता. पन्हाळा) येथील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी कमी झाल्याने सन्नाटा पसरला.