संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: कोल्हापुरात रविवारी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. शाळांना सुट्टी असल्यामुळे अनेकांनी मुलांसह नातेवाईकांसोबत रविवारची सुट्टी जोडून घेत सहल आणि देवदर्शनासाठी कारणी लावली. मंगळवारी मतदान, बुधवारी शिवजयंती आणि शुक्रवारी अक्षय तृतिया असाही मुहूर्त भाविकांनी साधला. यामुळे रविवारी कोल्हापुरात तब्बल ५६ हजार ९५४ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. शहरात मोठी गर्दी झाल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
सुटीला जोडून पर्यटनासाठी बाहेर पडलेले पर्यटक आणि भाविकांमुळे रविवारी कोल्हापूर हाऊसफुल झाले होते. बाहेरगावांहून आलेल्या पर्यटकांमुळे रविवारी कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक आणि पर्यटनस्थळांवर गर्दी होती. पुणे, मुंबईहून आलेल्या पर्यटकांनी करवीरनिवासिनी अंबाबाई देवी, जोतिबा डोंगर, न्यू पॅलेस, किल्ले पन्हाळगड, नरसोबाची वाडी या ठिकाणी गर्दी केली. यामुळे शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जयोतिबा रोड, खासबाग, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, चप्पल लाइन, पापाची तिकटी, आदी परिसरात पर्यटकांची गर्दी होती. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने शहरातील खासगी यात्री निवास, धर्मशाळा, तसेच घरगुती राहण्याची ठिकाणेही हाऊसफुल होती.
अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी
अंबाबाई मंदिरात देवीदर्शनासाठी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांची गर्दी असल्याचे चित्र रविवारी दिवसभर दिसत होते. मंदिराबाहेरील चप्पल स्टँडवरील आपले चप्पल शोधून काढण्यासाठी अनेक भाविकांची तारांबळ उडाली होती.