पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पश्चिमेस असलेल्या विस्तीर्ण अशा मसाई पठारावर रंगीबेरंगी रानफुलांची मुक्त उधळण झाली आहे. निसर्गनिर्मित सप्तरंगांचा हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची गर्दी मसाई पठारावर होऊ लागली आहे.
महाराष्ट्रातील सर्वांत मोठे, पण दुर्लक्षित असलेले मसाई पठार सुमारे १००० एकर असे सलग आहे. या पठाराचे नऊ विभाग आहेत. या प्रत्येक विभागाला स्थानिक निरनिराळी नावे असून, प्रत्येक विभागातील दरीमध्ये पाणी, झाडे व प्राचीन गुहा आहेत.
मसाई पठारावर सध्या रानफुलांचा हंगाम सुरू असून, विविध नैसर्गिक फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. विस्तीर्ण अशा हिरव्या गवताच्या गालीच्यावर फुललेली सफेद मुसळी (क्लोरोफायटम), सोनकी (सेनीसीओ), केना (कॅमेलोना), कापरू (बिओनिआ), मंजिरी (पोगोस्टीमोन डेक्कननेन्सीन), नीलवंती (सायनोटीस), सीतेची आसव (युट्रीक्युलेरीया), सफेद गोंद (इरिओकोलास), निलीमा (निलीमा), कंदीलफुल (सिरोपोनीया), दीपकाडी (डिपकॅडी), याशिवाय रान कोथिंबीर, रानहळद, जंगली सुरण, तेरडा या औषधी वनस्पती पाहावयास मिळतात.निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर म्हणाले की, मसाई पठारावरील बेसॉल्ट लॅट्राईट खडक हा पाऊस, वारा यांच्यामुळे झीज पावून त्यावर हलक्या प्रमाणात मातीचा थर निर्माण होतो आणि यावर ही नैसर्गिक फुलांची बाग तयार होते. बेसॉल्टच्या खडकामुळे येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू झाले आहे. यावर वेळीच कारवाई केली तर पुढच्या अनेक पिढ्या ही नैसर्गिक फुलांची बाग अनुभवत राहतील.पन्हाळा किल्ल्याजवळील मसाई पठार हे हजार एकर जागेत पसरलेले एक दुर्मिळ टेबल लॅँड. मसाई पठार जसा विविध शाखेतील शास्त्रज्ञांचा संशोधनाचा, अभ्यासाचा विषय आहे तसाच तो एक मस्त पिकनिक स्पॉट आहे. ऋतु कोणताही असो मसाई पर्यटकांना साद घालतोच... ऐन उन्हाळ्यात मनाला स्पर्श करुन जाणाऱ्या गार वाºयाच्या झुळुक, धो-धो पावसाळ्यात... धुक्यात हरविलेल्या मसाई पठाराचा रोमांच अन हिवाळ्यात रंगीबेरंगी रानफुलांची मुक्त उधळण...असे अनेक निसर्गाचे अविष्कार अनुभवयास मिळतात.