शहरात अकरा केंद्रांवर, तसेच सीपीआर रुग्णालयात ही मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु, कोल्हापूर महानगरपालिकेकडील लसीचा साठा संपल्यामुळे शुक्रवारपासून लसीकरणाची मोहीम थांबविण्यात आली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे तातडीने लसीची मागणी करण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी १२ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे पुन्हा लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. शनिवारी दुपारनंतर १९७६ व्यक्तींना लसीकरण केले.
लस आली असल्याची माहिती नागरिकांना कळताच रविवारी लॉकडाऊन असूनही केंद्राजवळील नागरिकांनी लस घेण्याकरिता केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही लसीकरणाची गती वाढवून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न केला. रोज सरासरी तीन हजार नागरिकांचे लसीकरण केले जात होते. रविवारी मात्र एकाच दिवसात ४६३७ व्यक्तींना लस देण्यात आली. आज, सोमवारी एक दिवस पुरेल एवढाच साठा आता शिल्लक राहिला आहे.
-तीस हजार डोसची मागणी-
लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ ३० हजार डोसची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्याचे लसीकरण मोहिमेचे नियंत्रण अधिकारी डॉ. अमोलकुमार माने यांनी सांगितले.
९१ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण-
शहरातील ९१ हजार ३३१ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या ८२ हजार २३८, तर दुसरा डोस घेतलेल्या ९०९३ नागरिकांचा समावेश आहे.