ग्रामपंचायतीचे आज, बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आपापल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये जोडण्या करण्यासाठी सदस्य गुंतले आहेत. आचारसंहिता असल्याने कोणतेही मोठे निर्णय जिल्हा परिषद घेऊ शकत नाही. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रशासकीय मान्यता देऊन संपल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत येऊन फार काही निधी पदरात पडण्याची शक्यता नाही.
दुसरीकडे सध्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मुदत संपत आली आहे. २ जानेवारी २०२१ रोजी या पदाधिकाऱ्यांना एक वर्ष होत आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचेही वारे वाहत आहे. परिणामी जिल्हा परिषदेत येऊन काय करायचे, असा प्रश्न असल्याने अनेक सदस्य इकडे येण्यापेक्षा मतदारसंघात थांबण्याकडे लक्ष देत आहेत. नेत्यांनीही संबंधितांना आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.
अशा परिस्थितीत आता सदस्यांची जिल्हा परिषदेतील उपस्थिती कमी झाली आहे. दिवसभर ठिय्या मारून बसणारे पदाधिकारीही आता कामापुरते येत आहेत. शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या गावची निवडणूक लागली आहे. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यावर त्यांच्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. राजू मगदूम यांची माणगावची निवडणूक लागल्याने तेदेखील जिल्हा परिषदेत आता फिरकेनासे झाले आहेत.