कोल्हापूर : व्हॅलेंटाईन डे तसेच रविवारच्या सुट्टीमुळे सायंकाळी महाद्वार रोड गर्दीने फुलला असतानाच भरधाव मोटार कार गर्दीत शिरली. यानंतर एकच गोंधळ उडाला, मोटारीने चौघांना धडक दिली. मद्यधुंद मोटारचालकाची वाहतूक शाखेच्या पोलिसाशी झटापट झाली. संतप्त नागरिकांनी चालकास बेदम चोप देत मोटारीची मोडतोड केली. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पाऊण तास हा थरार सुरू होता. रात्री उशिरा संबंधित मोटारचालकाचे नाव निष्पन्न झाले. त्याच्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
रविवार असल्याने महाद्वार रोड गर्दीने फुुलला होता. प्रथमेश रवींद्र निकम (वय २७, रा. जगतापनगर, पाचगाव, ता. करवीर) हा मोटार घेऊन बिनखांबी गणेश मंदिरमार्गे वेगाने गर्दीत घुसला. मोटारीने महाद्वार चौक, ताराबाई रोडवर दोन महिलांसह चौघांना धडक देऊन जखमी केेेले. मोटार धावत असतानाच गोंधळ उडाला, काहींनी मोटारीचा पाठलाग केला. मोटारीने वाहनांना धडक दिली. पोलीस कृष्णात पोवार यांनी पाठलाग करून मोटार सरस्वती चित्रमंदिरसमोर अडवली. नागरिकांनीही चालकांवर हात साफ केले. चालक मोटार घेऊन निवृत्ती चौकाकडे गेला. पुढे अचानक तरुण मंडळानजीक काहींनी मोटार अडवून चोपले. मोटारीची मोडतोड करून नुकसान केले. पोलीस कृष्णात पोवार हेही तेथे पोहोचले. त्यांनी चालकास नागरिकांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. तेथेही नागरिकांनी चालकास चोपले. झटापटीतच चालकाने मोटारीची नंबरप्लेट काढून ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत त्याने मोटारीसह पलायन केले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.
झटापटीत पोलीस जखमी
भरधाव मोटार शहर वाहतूक शाखेचे ड्युटी बजावणारे पोलीस कृष्णात पोवार यांनी सरस्वती चित्रमंदिरसमोर अडवली. त्यावेळी कारचालक आणि पोवार यांच्यात झटापट झाली. त्यानंतर पुढे पुन्हा निवृत्ती चौकात चालकाला नागरिकांच्या मारहाणीतून वाचवताना त्याने उलट पोवार यांनाच धक्काबुक्की करत त्यांचा गणवेश फाडला. झटापटीत पोवार जखमी झाले.
फोटो नं. १४०२२०२१-कोल-कृष्णात पोवार (जखमी पोलीस)