कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजारपेठेत विविध वस्तू, भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाली; मात्र ११ नंतर शहरात सर्वत्र माणसांची आणि वाहनांची वर्दळ मंदावली. दरम्यान, सकाळी केवळ चार तासच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने या वेळेत विविध वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांची तारांबळ उडताना दिसली. विक्रेते, व्यापाऱ्यांनाही धावाधाव करावी लागली.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला. हा लॉकडाऊन उठवल्यानंतर सोमवारी पहिल्या दिवशीही सकाळच्या टप्प्यात गर्दी राहिली. दुसऱ्या दिवशी मंगळवारीही असेच चित्र राहिले. विविध वस्तू खरेदीसह राष्ट्रीयीकृत बँकांंतही गर्दी होती.
शहरातील लक्ष्मीपुरील भाजी मंडईत सकाळी आठनंतर गर्दीला सुरुवात झाली. ११ पर्यंत गर्दी कायम राहिली. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करीत राहिले; पण खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याने गर्दी ओसंडून वाहिली. बेकरी, किराणा साहित्य नेण्यासाठीही गर्दी होती. सोशल डिस्टन्स ठेवणे अडचणीचे ठरले.