कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजारपेठेत विविध वस्तू, भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाली; मात्र ११ नंतर शहरात सर्वत्र माणसांची आणि वाहनांची वर्दळ मंदावली. दरम्यान, सकाळी केवळ चार तासच दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने या वेळेत विविध वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांची तारांबळ उडताना दिसली. विक्रेते, व्यापाऱ्यांनाही धावाधाव करावी लागली.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला. हा लॉकडाऊन उठवल्यानंतर सोमवारी पहिल्या दिवशीही सकाळच्या टप्प्यात गर्दी राहिली. दुसऱ्या दिवशी मंगळवारीही असेच चित्र राहिले. विविध वस्तू खरेदीसह राष्ट्रीयीकृत बँकांंतही गर्दी होती. शहरातील लक्ष्मीपुरील भाजी मंडईत सकाळी आठनंतर गर्दीला सुरुवात झाली. ११ पर्यंत गर्दी कायम राहिली. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करीत राहिले; पण खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची संख्या अधिक असल्याने गर्दी ओसंडून वाहिली. बेकरी, किराणा साहित्य नेण्यासाठीही गर्दी होती. सोशल डिस्टन्स ठेवणे अडचणीचे ठरले.
शाहूपुरी, कपिलतीर्थ, ताराबाई रोड भाजीमंडईत भाजीपाला खरेदीसाठी महिलांची संख्या लक्षणीय राहिली. या ठिकाणी गर्दी उसळली. सकाळी ११ नंतर दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्याने गर्दी आपोआप कमी झाली. महापालिका, वाहतूक पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक फिरून वेळेची मर्यादा पाळत नसलेल्या दुकानांवर कारवाई करीत राहिले. फुटपाथवर बसून फळे, भाजीपाला विक्री करणाऱ्यांवरही पथकाची करडी नजर होती. शिवाजी विद्यापीठ रोड, आर. के. नगर, कसबा बावडा यांसह शहरातील प्रमुख रस्ते, मैदानात मॉर्निंग वॉकसाठीही वर्दळ वाढली होती. शिवाजी विद्यापीठ रोड, आर. के. नगर, कसबा बावडा यांसह शहरातील प्रमुख रस्ते, मैदानात मॉर्निंग वॉकसाठीही वर्दळ वाढली होती.
चौकट
बँकांच्या बाहेर रांगा
शहरातील अनेक राष्ट्रीयीकृत बँकाच्यासमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी दोनपर्यंत वेळेची मर्यादा असल्याने ग्राहकांनाही या वेळेत व्यवहार करताना धावपळ करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे.
रेशन दुकानासमोरही
अंतोदय आणि प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना माफक दरात धान्य मिळते. ते धान्य नेण्यासाठी शहर आणि उपनगरातील बहुतांशी स्वस्त धान्य दुकानासमोर गर्दी होती. रांगाही लागल्या होत्या. वेळेत धान्य नेणे बंधनकारक असल्याने लाभार्थी रांगेत थांबून धान्य घेऊन गेले. दुकानदार सोशल डिस्टन्स राखण्याच्या वारंवार सूचना देत होते. काही ठिकाणी या नियमाचे काटेकोर पालनही झाले.
औद्योगिक वसाहतीमध्ये वर्दळ वाढली
शहर, उपनगर आणि पंचतारांकीत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील छोटे, मोठे उद्योग पूर्ववत सुरू झाले. या वसाहतीमध्ये दिवसभर कामगारांची वर्दळ वाढल्याचे जाणवले. राष्ट्रीय महामार्गावरही वाहनांची संख्या वाढली. शहरात वाहनांची वर्दळ अधिक असलेल्या रस्त्यावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेलसाठी काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.